खर्च भागविण्यासाठी पैशांची जुळवाजुळव! 150 कोटींचे बिले मार्चअखेर काढणार : NMC News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC

NMC News : खर्च भागविण्यासाठी पैशांची जुळवाजुळव! 150 कोटींचे बिले मार्चअखेर काढणार

नाशिक : आर्थिक वर्ष संपण्यास तीन दिवस शिल्लक राहीले असताना खर्च भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पैशांची जुळवाजुळव सुरू असतानाच मुद्रांक शुल्काच्या एक टक्का निधीतून १३ कोटी, तर घरपट्टीच्या माध्यमातून १८० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आर्थिक टंचाईच्या काळात महापालिकेला दिलासा मिळाला आहे. (Matching money to cover expenses 150 crore bills will drawn by end of March NMC News)

३१ मार्चला आर्थिक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे लेखा विभागात जवळपास दिडशे कोटी रुपयांचे देयके येऊन पडली आहे. लेखापरिक्षण विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर देयकांची रक्कम अदा केली जाईल. त्यापूर्वी प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा आकडा धडकी वाढविणारा होता.

परंतु त्यापूर्वीच राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्काचा एक टक्का अधिभाराचे साडेतेरा कोटी रुपये प्राप्त झाले. त्यामुळे दिलासा मिळाला तर लेखा विभागाने देयके अदा करताना सावध पवित्रा घेतला आहे. बांधकाम विभागाचे सर्वाधिक देयके असल्याने ४५ कोटी रुपयांची देयके मंजूर केली जाणार आहे. त्यामुळे ठेकेदारांना बिले काढण्यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

घरपट्टी वसुलीची उद्दिष्टांपुढे झेप

२०२२-२३ या आर्थिक वर्षांकरिता घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट १५० कोटी, तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट साठ कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी हवा असेल तर घरपट्टी व पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याच्या राज्य शासनाकडून सूचना होत्या.

त्यामुळे सुधारित अंदाजपत्रकामध्ये घरपट्टीसाठी १८५ तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७५ कोटी रुपयांचे निश्चित करण्यात आले. वसुलीसाठी मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांची यादी तयार करून ७५ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविण्यात आली. थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजविण्यात आला.

त्यामुळे घरपट्टीतून १८० कोटी रुपये महसुल प्राप्त झाला. मागील वर्षी १३९ कोटी रुपये वसुल झाले होती. यंदाच्या वसुलीत ४२ कोटी रुपयांनी वाढ झाली. दरम्यान पाणी पट्टी वसुली मात्र संथगतीने सुरू आहे. पाणीपट्टी वसुलीचे ७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ६१ कोटी रुपये वसुली झाली.

टॅग्स :Nashik