Nandur Madhmeshwar Bird Sanctury : पक्षी अभयारण्यातील नांदूरच्या राणीचे ऐन उन्हाळ्यात वीण! | mating period of jambhali pankombadi started at nandurmadhyameshawar from June to September nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jambhali pankombadi with chicks in the dry May sun at the bird sanctuary.

Nandur Madhmeshwar Bird Sanctury : पक्षी अभयारण्यातील नांदूरच्या राणीचे ऐन उन्हाळ्यात वीण!

Nandur Madhmeshwar Bird Sanctury : महाराष्ट्राचे पक्षीतीर्थ नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात मेमध्ये ‘नांदूरीची राणी' म्हणून मान मिळालेल्या जांभळ्या पाणकोंबडीची वीण मेच्या रणरणत्या उन्हात पाहावयास मिळत आहे.

मुळातच, या पक्ष्यांच्या वीणचा कालावधी जून ते सप्टेंबर असा असतो. पाऊस सुरु झाल्यावर हे पक्षी घरटी बनवायला सुरवात करतात. (mating period of jambhali pankombadi started at nandurmadhyameshawar from June to September nashik news)

अभयारण्यात जांभळ्या पाणकोंबडीची संख्या अधिक असल्याने तिला ‘राणी’ चा मान मिळाला आहे. ही पाणकोंबडी मेमध्ये पिल्लांसमवेत फिरताना अभयारण्यात आता दिसत आहे. त्यांनी मार्चमध्ये घरटी बनवल्याचे दिसते.

उन्हाळ्यात बहुतांश पक्षी वीण करत नाहीत. पावसाळ्यात पिल्लांसाठी खाद्य उपलब्ध होत असल्याने हा कालावधी वीणसाठी असतो. अभयारण्यात अडीचशेहून अधिक जातीचे पक्षी असून २४ जातीचे मासे आणि चारशेहून अधिक वनस्पती इथे आहेत.

जांभळी पाणकोंबडी हा पक्षी पाणकोंबडी प्रकारातील आहे. देशात विपुल प्रमाणात आढळतो. नदीकाठ, दलदली, तळी ही या पक्ष्याची आवडती वस्तीस्थाने आहेत. जांभळ्या रंगामुळे हा पक्षी चटकन दुरून ओळखू येऊ शकतो. हा पक्षी आकाराने कोंबडीएवढा असतो.

जांभळट निळ्या रंगाचा असतो. लांब तांबडे पाय, पायांची बोटे लांब असतात. कपाळ तांबडे आणि त्यावर पिसे नसतात. चोच लहान, जाड व लाल रंगाची असते. भुंड्या शेपटीखाली पांढऱ्या रंगाचा डाग असतो.

शेपटी खालीवर हलविण्याच्या तिच्या सवयीमुळे हा डाग ठळक दिसतो. नर-मादी दिसायला सारखे असतात. जोडीने अथवा समूहात आढळतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पावसाच्या विलंबाचे संकेत

वातावरण बदलाच्या परिणामामुळे पावसाच्या विलंबाचे संकेत निसर्गामधून मिळत आहेत. वर्षभर होणाऱ्या पावसामुळे पक्ष्यांच्या वीण कालावधीत बदल होत असल्याचे एकीकडे दिसत असताना पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या वीणमुळे निसर्गचक्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. यंदा पक्ष्यांचे ‘रिटर्न मायग्रेशन’ महिनाभर उशिरा झालेले आहे.

पक्ष्यांची दिसलीत घरटी

पक्षी अभयारण्य आणि परिसरात पक्ष्यांच्या घरट्यांचा अभ्यास केला असता, किंगफिशरच्या अभयारण्यात आढळणाऱ्या तीनही जातींनी गोदावरी नदी पात्रात घरटी बनवल्याचे पाहावयास मिळाले. वेडाराघू हा पक्षी या परिसरात घरटी बनवत असल्याचे दिसून आले. वटवट्याच्या अनेक जाती घरटी बनविण्यात व्यस्त असून हळद्या या पक्ष्याने वीण सुरु केल्याचे आढळले.

"आम्ही गेली दोन महिने पक्षी अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांच्या घरट्यांचा अभ्यास करत असून यंदा आम्हाला जांभळ्या पाणकोंबडीची पिल्ले दिसून आली. पूर्वी पावसाळ्यानंतर ही पिल्ले अभयारण्यात दिसत होती. ती आता मे मध्ये पाहावयास मिळत आहेत."- रोषण पोटे, गाइड