esakal | महापौर आध्यात्मिक गुरूच्या भूमिकेत! नाशिककरांना आत्मविश्वास वाढविण्याचा सल्ला

बोलून बातमी शोधा

satish kulkarni
महापौर आध्यात्मिक गुरूच्या भूमिकेत! नाशिककरांना आत्मविश्वास वाढविण्याचा सल्ला
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरातील ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसल्याची कबुली देताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरित उपचार सुरू करण्याचा सल्ला देताना आत्मविश्वास वाढविण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर प्राणायम, योगा सातत्याने करण्याचे आवाहन नाशिककरांना करताना राजकीयतून ते आध्यात्मिक भूमिकेत आले आहेत.

महापौर कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी यापैकी कुठल्याही पॅथीनुसार त्वरित उपचार सुरू करावेत. ॲन्टिजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करून रिपोर्ट यायला वेळ असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावा. आरटीपीसीआरचा रिपोर्ट येण्यास विलंब होत असल्याने तत्काळ उपचार सुरू केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होते. कोरोनाच्या कालावधीत भीतीला दूर ठेवता येईल. तेवढे उपचाराने बरे होता येईल. कोरोनाची लक्षणे दिसली तरी घाबरून जाऊ नका, कोरोनाचा आजार नक्की बरा होतो. नाशिककरांनी आत्मविश्वास ठेवावा, भीती निर्माण झाल्यास हृदयाचे ठोके वाढतात. यामुळे अधिक त्रासाला सामोरे जावे लागते. होमिओपॅथी, आयुर्वेदिक व ॲलोपॅथी ही औषधे विनाविलंब सुरू केल्यास आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून आपला आत्मविश्वासही वाढतो.

हेही वाचा: एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी

प्राणायम, योगा करा

प्राथमिक स्वरूपातच कोरोनावर उपचार करून पायबंद घातल्यास स्वत:बरोबरच कुटुंब बाधित होणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण रोज सकाळी वेळ देऊन प्राणायाम व आयुर्वेदात सांगितलेली जलनेती क्रिया केल्यास कोरोनाला नक्कीच दूर ठेवता येईल. पुणे येथील पं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा प्रयोग सातत्याने केला जात असून, त्या रुग्णालयाच्या ६०० कर्मचाऱ्यांना अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. यासाठी जलनेती क्रिया, प्राणायाम तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी औषधे घेतल्यास कोरोनासारख्या महाभयंकर आजारास आपण दूर ठेवू शकतो, असे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा: साप, विंचू परवडले; पण कोरोना नको! भीतीमुळे ग्रामस्थांनी शेतात थाटला संसार