
MBA CET Exam : सर्व्हर बंद पडल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळ; परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी
पंचवटी (जि. नाशिक) : दिंडोरी रोडलगतच्या नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या एमबीए सीईटी परीक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडल्याने परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी शनिवार (ता. २५) रोजी दुपारी बाराच्या सुमारास गोंधळ घातला. ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी किंवा विद्यार्थ्यांना गुण वाढू द्यावे अशी मागणीचे पत्र विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिले. (MBA CET Exam Confusion at exam center due to server shutdown Students demand to retake exam nashik news)
एमबीएच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी परीक्षेसाठी या केंद्रावर ४३१ विद्यार्थी हजर झाले होते. राज्यभरातील विविध भागातून आलेले हे विद्यार्थी व त्यांचे पालक नाशिकला मुक्कामी होते. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत हजर होते.
सर्व्हर पंधरा मिनीटे उशिराने सुरु झाल्याने परीक्षा केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांना वेळ वाढून देण्याचे आश्वासन दिले होते. परीक्षा सुरु असताना अधूनमधून सर्व्हर बंद पडत होते. तसेच परीक्षेच्या नियोजित वेळेच्या अगोदरच विद्याथ्यांचा पेपर आपोआप जमा झाल्याचा प्रकार घडला.
या प्रकाराने संतप्त झालेल्या विद्यार्थी व पालकांना परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
त्यांनी विद्यार्थी-पालक व परीक्षा केंद्रप्रमुख यांचे म्हणणे ऐकून घेत मध्यस्थी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्य लक्षात घेऊन पोलिसांनी विद्यार्थ्यांकडून तक्रार अर्ज स्वीकारून, केंद्र प्रमुख व सर्व्हर प्रमुख यांचे जबाब नोंदविले आणि सीईटी परीक्षा घेणाऱ्या संस्थेसोबत पत्र व्यवहार करणार असल्याचे सांगितले.
"विद्यार्थी लांबचा प्रवास करून एमबीए सीईटीची परीक्षा देण्यासाठी आले, त्यांचे परीक्षेच्या वेळी सर्व्हर डाऊनच्या समस्यांमुळे नुकसान होणार असेल तर याची जबाबदारी कोण घेणार0 परीक्षा केंद्रप्रमुख हे पालक व विद्यार्थी यांच्याशी बोलायला तयार नाहीत."
- तेजस राजपूत, छत्रपती संभाजीनगर