MHT CET Exam: PCBला 214 विद्यार्थ्यांची दांडी! पहिल्‍याच दिवशी 7 टक्‍के विद्यार्थी गैरहजर | MHT CET Exam 214 students to PCB 7 percent students absent on first day itself nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mht cet exam

MHT CET Exam: PCBला 214 विद्यार्थ्यांची दांडी! पहिल्‍याच दिवशी 7 टक्‍के विद्यार्थी गैरहजर

MHT CET Exam : सीईटी सेलतर्फे घेण्यात येत असलेल्‍या एमएचटी-सीईटी परीक्षेंतर्गत सोमवार (ता.१५) पासून भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) ग्रुपची परीक्षा सुरु झाली.

पहिल्‍याच दिवशी सुमारे सात टक्‍के विद्यार्थी गैरहजर राहिले. दोन्ही सत्र मिळून २१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली असून, तीन हजार १२२ विद्यार्थ्यांनी उपस्‍थित राहून परीक्षा दिली. (MHT CET Exam 214 students to PCB 7 percent students absent on first day itself nashik news)

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांच्‍या पदवीच्‍या प्रथम वर्षासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेच्‍या आधारे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. दरम्‍यान पहिल्‍या टप्‍यातील पीसीएम ग्रुपची परीक्षा पूर्ण झाली आहे. आता सोमवारपासून दुसऱ्या टप्‍यात पीसीबी ग्रुपच्‍या परीक्षेला सुरवात झालेली आहे.

नाशिक जिल्‍ह्‍यातील परीक्षा केंद्रांवर सोमवारी सकाळपासून विद्यार्थ्यांसह पालकांची लगबग बघायला मिळाली. सकाळ सत्रात प्रविष्ट झालेल्‍या एक हजार ६६१ विद्यार्थ्यांपैकी एक हजार ५५१ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्‍थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर ११० विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. दुपारच्‍या सत्रामध्ये प्रविष्ट झालेल्‍या एक हजार ६८५ पैकी एक हजार ५७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. तर उर्वरित ११४ विद्यार्थी गैरहजर होते. यापूर्वी पीसीएम ग्रुपच्‍या परीक्षेला सरासरी ९७ टक्‍के उपस्‍थिती असताना पीसीबी ग्रुपच्‍या परीक्षेला मात्र पहिल्‍या दिवशी उपस्‍थितीचे प्रमाण ९३ टक्‍के राहिले आहे.

रसायनशास्‍त्र, भौतिकशास्‍त्रच्‍या प्रश्‍नांनी घेतली परीक्षा

पहिल्‍या दिवशी झालेल्‍या परीक्षेत रसायनशास्‍त्र आणि भौतिकशास्‍त्र विषयाच्‍या प्रश्‍नांची काठिण्य पातळी अधिक राहिल्‍याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. संगणकावर आधारित असलेल्‍या या परीक्षेत निर्धारित वेळेत सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी कस लागत असल्‍याचीही प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

टॅग्स :NashikPCBMHT CET