
Nashik News : मनमाडला साकारणार MIDC; प्रस्तावाला उद्योग मंत्रालयाची मंजुरी
नाशिक : दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ललाटी लागलेला टिळा पुसण्यासाठी नांदगाव तालुक्यात मनमाड शहरालगत तब्बल पावणेआठशे एकरांवर ‘एमआयडीसी’ उभारण्यात येणार आहे.
यासंदर्भात आमदार सुहास कांदे यांनी दिलेल्या प्रस्तावास उद्योग मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. प्रस्तावावर आनुषंगिक पूर्तता झाल्यानंतर याबाबतचे आदेश काढले जातील. (MIDC to play Manmad Approval of proposal by Ministry of Industries Nashik News)
मनमाड शहरात रेल्वे जंक्शन असूनही पुरेशा पाण्याअभावी येथे आजवर मोठे प्रकल्प उभे राहिले नाहीत. पानेवाडी येथील इंधन साठ्याचा प्रकल्प सोडला तर औद्योगिकदृष्ट्या शहराचा विकास झालेला नाही. त्यामुळे शहरात रोजगारासह अनेक समस्या कायम आहेत. याबाबत आमदार कांदे यांनी पाठपुरावा करत एमआयडीसी होण्याबाबत आग्रही राहिले.
मनमाड ते येवला रस्त्यावरील वंजारवाडी शिवारातील शासकीय व खासगी अशा एकूण ७७५ एकरांवर ही औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. त्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावावर उद्योग मंत्रालयात दोनदा बैठका झाल्या. त्यात उद्योगांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
मनमाड रेल्वेस्थानक असल्याने उद्योगासाठी ही मोठीच पूरकबाब असल्याचे आमदारांनी नमूद केले. एमआयडीसीच्या मंजुरीबाबतचे पत्र १३ फेब्रुवारीला जारी करण्यात येणार आहे. पत्र मिळताच एमआयडीसीतर्फे शासकीय जागेवर एमआयडीसीचे नाव लावले जाईल.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
आवश्यक त्या ठिकाणी खासगी जागा अधिग्रहीत केली जाणार आहे. प्लॉट पाडल्यानंतर उद्योगांची निश्चिती होणार आहे. या प्रकल्पामुळे नांदगावसह चांदवड, येवला तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
करंजवण योजनेचा प्रारंभ
मनमाड शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनमाडला करण्यात येणार आहे. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री तानाजी सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.
"तालुक्याच्या विकासासाठी स्वप्न बघितलेले दोन्ही प्रकल्प एकाच वेळी पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळेलच, शिवाय मनमाड शहरासह तालुक्याची ओळखही बदलणार आहे." -सुहास कांदे, आमदार नांदगाव