
MLA Satyajeet Tambe: शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जि. प.ला अल्टिमेटम; आमदार तांबे
MLA Satyajeet Tambe : जिल्हा परिषदेच्या माध्यामिक व प्राथमिक शिक्षण विभागाशी निगडित शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्हा परिषद पातळीवर या प्रश्नांची सोडवणूक करणे शक्य असल्याने हे प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला अल्टिमेटम दिला.
प्रशासनाने हे प्रश्न सोडविण्यासाठी काम करावे तर, शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काम करावे, असे आमदार तांबे यांनी यावेळी सांगितले. (MLA Satyajeet Tambe statement To solve problems of teachers ultimatum to zp nashik news)
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात गुरुवारी (ता.८) आमदार तांबे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत बैठक घेतली. बैठकीस मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, प्रभारी शिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांसह प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रप्रमुख पदे भरली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता, जून २०२३ अखेर या पदासाठी स्पर्धा परिक्षा घेऊन १२२ पदे भरली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. मुख्याध्यापकांची पदे पदोन्नतीने भरली जातात.
मात्र, दीड वर्षापासून या पदोन्नत्या झालेल्या नसल्याचे संघटनांनी सांगितले. सद्यःस्थितीत २६८ मुख्याध्यापकांची पदे रिक्त असून, संचमान्यता मिळाल्यानंतर मुख्याध्यापक मंजूर पदानुसार पदोन्नती प्रक्रीया राबविली जाईल, असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले.
त्यावर, ही प्रक्रीया महिना भरात पूर्ण करावी असे आमदार तांबे यांनी निर्देश दिले. पदवीधर शिक्षकांची रिक्त पदाचा मुद्यावरही चर्चा झाली. तब्बल ६०८ पदे रिक्त असून जिल्हा परिषदेची बदली प्रक्रीया पूर्ण झालेली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे लवकरच पदोन्नतीची प्रक्रीया पूर्ण केली जाईल असे सांगण्यात आले. आर्थिक फरक बिले, मेडीकल बिले, सेवानिवृत्त शिक्षकांचे देयकांना विलंब लावत जात असल्याच्या तक्रारी यावेळी संघटना प्रतिनिधींनी केल्या.
ही बिले वेळात मिळत नाही त्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. यासंबंधातील फाईली टेबलावरून लवकर हालत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यावर, आमदार तांबे यांनी सदर बाब गंभीर असल्याचे सांगत, शिक्षकांचे बिले वेळात काढण्याबाबत सूचना केल्या.
याशिवाय उशिराने होणार वेतन, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचे प्रभारी पदभार, नियमित शिक्षक संघटनांची बैठक घेणे, निवडकश्रेणी प्रस्ताव आदी १५ विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
शिक्षकांचे प्रश्न गंभीर असून सदर प्रश्नांवर प्रशासनाशी चर्चा झाली आहे. प्रशासनपातळीवर या प्रश्नांची सोडवणूक होणार असल्याने त्यासाठी प्रशासनाला कालावधी निश्चित करून दिला असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.