esakal | दहा दिवस उद्योग बंद ठेवा; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बोलून बातमी शोधा

Seema Hire
दहा दिवस उद्योग बंद ठेवा; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू केली असली तरी कामगारांच्या पोटापाण्याचा विचार करून उद्योग सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, कामावर जाताना कामगार घरातून बाहेर पडतो, त्यावेळी कुटुंब चिंतेत पडते. घर चालविण्याची जबाबदारी असलेला कुटुंबप्रमुख हरपला तर कुटुंब बेसहारा होईल, अशी भीती आहे. कामगारांची मानसिकता व एकाला लागण झाल्यास संपूर्ण कामगार धोक्यात येण्याची मालकांची भूमिका लक्षात घेऊन चर्चेअंती उद्योजकांनीदेखील दहा दिवसांसाठी उद्योग बंद करण्याची तयारी दर्शविली आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार सीमा हिरे यांनी दहा दिवसांसाठी उद्योग बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

संचारबंदी लागू करताना औद्योगिक क्षेत्रासाठी सूचना व निर्बंध लाऊन सर्व उद्योग सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली. नाशिक जिल्हात दररोज पाच ते सहा हजार रुग्ण कोरोनाबाधित सापडत आहेत. मृत्यूचा आकडादेखील वाढत असून, शहरात एप्रिल महिन्यात अडीच हजार मृत्यू, तर ग्रामीण भागातदेखील तेवढेच मृत्यू होत आहे. जिल्ह्यात सध्या ४७ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आढळत आहे. मृत्यूची खरी आकडेवारी अद्यापही बाहेर पडत नाही. अशा भयानक परिस्थितीमध्ये कारखाने सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी आमदार हिरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात केली आहे.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

उद्योजकांची बंदची भूमिका

औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व कामगार नेत्यांशी आमदार हिरे यांनी चर्चा केली. त्यातून किमान दहा दिवस तरी उद्योग बंद झाले पाहिजे, असे मत मांडण्यात आले. त्यानुसार आमदार हिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. कारखाने बंद केले तर कोरोना संसर्गाची साखळी खंडित होऊ शकेल. अन्यथा दररोज बाधितांची संख्या वाढतच राहील. अनेक कामगार कोरोनाच्या विळख्यात सापडून काहींना मृत्यू झाला आहे. कामगारांचे कुटुंबे बेसहारा झाले आहे. जे बाधित आहेत, त्यांना हॉस्पिटल मिळत नाही. जे रुग्णालयात आहे, त्यांना खर्च परवडत नाही. कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी कारखाने त्वरित बंद करण्याचे आदेश द्यावे, असे आमदार सीमा हिरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिक ग्रामीणला कोरोनाचा विळखा घट्ट! दैनंदिन आकड्यात शहराला पछाडले