
Nashik News : गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ झालेली असली तरी, हा कल पदवी शिक्षणापुरता मर्यादित असल्याचे समोर येते आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमास दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून पदव्युत्तर पदवीसाठी जेमतेम साडे पाच हजार प्रवेश झालेले आहेत.
पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाऐवजी गेल्या काही वर्षांमध्ये व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेतून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने सहाजिकच या शाखेशी निगडित पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थी संख्या जास्त राहाते. (More admissions for degree than admissions for postgraduate nashik news)
त्यातही इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेतून पदवी अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यस्तरावर मोठी आहे. अभियांत्रिकीमध्ये संगणक व संलग्न शाखांना प्रतिसाद वाढलेला आहे. आयटी, कॉम्प्युटरसारख्या पारंपारिक तसेच सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून आधुनिक काळातील ब्लॉगचेन टेक्नॉलॉजी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणक्रमांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
परंतु हा प्रतिसाद पदवीपुरता मर्यादित असून, पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अद्यापही तुलनेत खूप कमी आहे. विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महाविद्यालयांकडूनही विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होतांना दिसत नसल्याची स्थिती आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
म्हणून 'पीजी'ला प्रतिसाद कमी..
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षापासून बहुतांश विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसायाचे वेध लागलेले असतात. त्यातच महाविद्यालयांकडून आपला लौकिक टिकविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन केले जाते. या उपक्रमांतून अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
तर काहींकडून लागलीच नोकरीचा शोध सुरु केला जातो. अशा परिस्थितीत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्याची अनेकांची मानसिकता नसल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील स्थिती अशी-
* पदवी अभ्यासक्रम (बीई/बी.टेक) उपलब्ध जागा---१ लाख ७६ हजार ८२६.
* पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी---१ लाख ६० हजार ७०५
* पदव्युत्तर पदवी (एमई/एम.टेक) उपलब्ध जागा---६ हजार १०९
* पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी--५ हजार ४८८.