
Nashik News : 8 दिवसात दोन हजारांहून अधिक तापाच्या रुग्णांची नोंद
Nashik News : परतीच्या मार्गावर असलेल्या पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असली तरी बदलत्या वातावरणामुळे तापाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, मागील आठ दिवसात दोन हजारांहून अधिक तापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. (More than 2000 fever patients reported in 8 days nashik News )
कधी मध्यम तर कधी मुसळधार पाऊस, कधी वाढते तापमान यामुळे शहरात तापसदृश्य आजाराची लाट आली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज दोनशे ते अडीचशे तापाचे रुग्ण तपासणीसाठी येत आहे, तर खासगी रुग्णालयांमध्येदेखील तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये तापसदृश आजाराच्या दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. महिनाभरात पाच हजारांहून अधिक तापाच्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
खासगी दवाखान्यांमध्ये यापेक्षा अधिक पटीने रुग्णांनी उपचार घेतले आहे. चिकूनगुनियाचा आजार नियंत्रणात आहे. मागील आठवड्यात एकही नवा रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. डेंगी रुग्णांची संख्यादेखील वाढताना दिसतं आहे.
पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून त्यात डेंगीच्या अळ्या होत असल्याने आजारांना निमंत्रण मिळत आहे. ऑगस्टमध्ये डेंगी रुग्णांची संख्या वाढली. सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात नियंत्रण असले तरी खासगी रुग्णालयात डेंगी रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. डोळ्यांची साथ नियंत्रणात आली आहे.