Nashik Political News : खासदारकीचा उमेदवार कोण? आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून चाचपणी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajay boraste, hemaent godse & bhausaheb chaudhary

Nashik Political News : खासदारकीचा उमेदवार कोण? आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून चाचपणी सुरू

नाशिक : राज्यात सत्ता स्थापनेनंतर नव्याने तयार झालेल्या राजकीय समीकरणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची चाचणी शिंदे गटाकडून सुरू झाले आहे. यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व नुकतेच प्रवेशकर्ते झालेले भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाची चर्चा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुरू झाली आहे.

२०१९ पूर्वी राज्यात भाजप व शिवसेना युती अस्तित्वात होती. परंतु, शिवसेनेने भाजपशी फारकत घेत महाविकास आघाडीत प्रवेश करून सत्ता स्थापन केली. सव्वादोन वर्ष मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे राहिले. परंतु, जून २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर घडले. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्याचे फलित म्हणून शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आले.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस असा नवा राजकीय पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला आला. त्यामुळे भविष्यात लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच पॅटर्ननुसार लढविल्या जातील. शिवसेनेची जागा भरून काढण्यासाठी शिंदे गटाला पुढे केले जात आहे. याचाच अर्थ यापूर्वी युती असताना शिवसेनेला ज्या जागा होतात, त्या जागांवर शिंदे गटाचे उमेदवार उभे राहतील. त्याअनुषंगाने नाशिकच्या लोकसभा उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होती. यात पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले व चांदवड- देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, शिंदे फडणवीस पॅटर्न अस्तित्वात आल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा युती झाल्यास शिंदे गटाला सोडली जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

हेही वाचा: Nashik Political News : निवडणूक ग्रामपंचायतची पण चर्चा विधानसभेची!

आमदारकीसाठी रान मोकळे

जातीय समिकरणांचा विचार करता नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाच्या उमेदवाराला राजकीय पक्षाकडून संधी मिळते. शिंदे गटाकडून लोकसभेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मागील आठवड्यात शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा आहे.

त्याशिवाय आता शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाची भर पडली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटात गोडसे, बोरस्ते व चौधरी यांच्यातदेखील चुरस निर्माण झाली आहे. बोरस्ते यांच्या नावासाठी भाजपचे आमदारदेखील आग्रही असल्याचे बोलले जाते. जेणेकरून आमदारकीच्या स्पर्धेत शिंदे गटातून कोणी राहणार नाही.

शिवसेनेचेही चाचपणी

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून चाचपणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढल्यास व नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडे आल्यास येथून नवीन उमेदवार देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी स्वतःच उमेदवारी जाहीर केले असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत होणाऱ्या पडझडीनंतरच निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: Nashik News : शेतात राबणाऱ्या कुसुम चव्हाणकेंच्या हाती गावाचा कारभार!