Nashik Accident News : सिन्नर जवळ एसटी बस अन् राजहंस दुध कंटेनरचा अपघात; 4 प्रवासी जखमी

Accidental Vehicle
Accidental Vehicleesakal

Nashik Accident News : राज्य परिवहन महामंडळाची शहापूर आगाराची शिर्डी-शहापूर बस व संगमनेर येथील राजहंस दूध संघाचा कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिन्नर-नाशिक मार्गावर माळेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल फाट्यावर घडली.

या अपघातात दोनही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून बसमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. (MSRTC bus rajhans milk tanker accident in Malegaon industrial estate area on Sinnar Nashik highway News)

शहापूर आगाराची एमएच 06/ एच 8560 बस शिर्डीवरुन सुमारे 40 प्रवासी घेऊन शहापूरकडे निघाली होती. सिन्नर येथे या बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आल्यावर चालकाने बस कार्यशाळेत नेऊन तपासणी केली होती.

तेथे किरकोळ दुरुस्तीचे काम केल्यावर बस पुढच्या प्रवासाला रवाना झाली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिकच्या दिशेने जात असताना माळेगाव औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या जिंदाल फाट्यासमोर ही बस अचानक एका बाजूने ओढली जात असल्याचे चालकाच्या लक्षात आले.

चालकाने प्रसंगावधान राखत बसचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दरम्यान समोरून येणाऱ्या राजहंस दूध संघाच्या कंटेनरवर ही बस धडकली. सुदैवाने यावेळी दोन्ही वाहनांचा वेग नियंत्रित असल्याने मोठा अनर्थ टळला.

या अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले तर अपघाताच्या धक्क्याने बसमधील काही प्रवासी सीट वरून खाली पडले. परिसरातील व्यावसायिक व रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनातील प्रवाशांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना खाली उतरण्यास मदत केली.

यावेळी जखमी झालेल्या चार प्रवाशांना खाजगी रुग्णवाहिनीतून सिन्नरला उपचारासाठी नेण्यात आले. अपघात घडल्यावर मार्गावर सुमारे अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. महामार्ग सुरक्षा पोलीस पथक व एमआयडीसी पोलिसांनी अपघात स्थळी येत वाहतूक सुरळीत केली.

सिन्नरचे आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर, बसस्थानक प्रमुख सुरेश दराडे, वाहतूक अधिकारी अण्णा पवार, उद्धव गवळी, देवा सांगळे, कार्यशाळा प्रमुख सौरभ रत्नपारखी यांनी धाव घेत अपघातग्रस्त बस रस्त्यावरून बाजूला केली. तसेच प्रवाशांची विचारपूस करत जखमींना दिलासा दिला. पर्यायी बस बोलावून या बसमधील सर्व प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी परवाना करण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Accidental Vehicle
Dhule Crime News : दुकानात छापा घालत दीड लाखाचा गुटखा जप्त

हे प्रवासी जखमी

बसमधून प्रवास करणाऱ्या रावदास सुखदेव खरात (60) यांच्या डाव्या भुवईच्या वरती जखम होऊन नऊ टाके पडले. सुमन रावदास खरात (51) यांच्या डाव्या पायाला मुकामार लागला व जखम झाली. हे दोघेही पतीपत्नी घाटकोपर (मुंबई) येथील रहिवासी आहेत.

वैशाली संदीप मोरे (33) रा. घाटकोपर यांच्या हनवटीला जखम झाली. पुष्पा मनोहर दुसाने समता नगर, जळगाव यांच्या नाकाला जखम झाली. या सर्व जखमींना सिन्नर येथील यशवंत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना एसटी प्रशासनाकडून तातडीची मदत म्हणून उपचारासाठी प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले. नियमानुसार रुग्णालयातील तपासण्यांचा व औषधोपचाराचा खर्च एसटी महामंडळाकडून करण्यात येईल असे आगार व्यवस्थापक श्री. नेरकर यांनी सांगितले.

Accidental Vehicle
Crime News: गर्लफ्रेंड सोबत फिरणाऱ्या रिक्षाचालकावर मुलीच्या जुन्या मित्राचा चाकू हल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com