Nana Patole | कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

Nana Patole | कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला : नाना पटोले

नाशिक : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसची विचारधारा सोडली नाही.

कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेसचा सच्चा पाईक व कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. (Nana Patole statement Lost voice fighting for workers nashik news)

नाशिक शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रात जयप्रकाश छाजेड सक्रिय असायचे. पक्ष संघटनेसोबतच कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत व कामगारांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छाजेड यांनी युवक काँग्रेसपासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती.

नाशिक शहर व राज्य पातळीवर त्यांनी पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले. विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी सार्थ ठरविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांच्या हितासाठी लढणारा एक आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. जयप्रकाश छाजेड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी छाजेड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Nashik News : जयप्रकाश छाजेड यांना भावपूर्ण निरोप

काँग्रेस पक्षातील एका पर्वाचा अस्त : उल्हास सातभाई

ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेस पक्षातील एका पर्वाचा अस्त झाला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करून ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले, अशा नेत्यांपैकी जयप्रकाश छाजेड हे प्रमुख नेते होते. पक्ष संघटनेत त्यांनी विविध स्तरावर कार्य केले.

पूर्वाश्रमी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. नाशिक महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली होती.

वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष असताना देशातील विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींच्या भाषणाचा लाभ त्यांनी नाशिककरांना करून दिल्याची आठवण आजही काढली जाते. पोस्टकार्डचा प्रभावी वापर करून कार्यकर्ते व प्रमुख व्यक्तींच्या वाढदिवशी यांचे पोस्टकार्डद्वारे केलेले अभीष्टचिंतन संबंधितांच्या घरी पोचत असे.

हेही वाचा: Winter Weather : थंडीचा तडाखा कायम; नाशिकचे किमान तापमान 9 अंशांवर!

पोस्टकार्डद्वारे ते अभिनंदन व शोक संदेश पाठवत असत. त्यांचा हा उपक्रम हयातभर सुरूच होता. युवक काँग्रेसचे पदाधिकारी असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी नाशिक शहरातील झोपडपट्ट्यांच्या समस्यांचा सर्व्हे करून त्याचा अहवाल तत्कालीन नगर विकासमंत्री रामराव आदिक यांना सादर केला होता.

नाशिकच्या राजकारणात पूर्वी ‘दाबाना’ गटाचा मोठा दबदबा होता. यातील दादा म्हणजे छाजेड, बाबा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा आणि नाना म्हणजे माजी खासदार कै. मुरलीधर माने असे समीकरण होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या गटाने अनेक तरुणांना उमेदवारी देऊन लोकप्रतिनिधी होण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी काही जणांनी पुढे लोकसभा आणि विधानसभेतही प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा: Nashik News : NMC उत्पन्नाची तूट तब्बल सव्वाचारशे कोटींवर; चालू आर्थिक वर्षाचे अंदाज कोलमडले

इंटकचा आवाज हरपला

छगनराव भुजबळ (माजी मंत्री) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी असून, इंटकचा आवाज हरपला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसह कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचलेला नेता हरपला. त्यांच्या निधनाने इंटक खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे.

काँग्रेसचा दीपस्तंभ मावळला

डॉ. शोभाताई बच्छाव (माजी मंत्री) : जयप्रकाश छाजेड यांच्या जाण्याने काँग्रेसचा दीपस्तंभ खऱ्या अर्थाने मावळला आहे. माझ्या महापौरपदासाठी, आमदारकीच्या तिकिटासाठी दादांनी मोठी मदत केली होती. त्यांच्या जाण्याने पक्षाची न भरून येणारी हानी झाली.

चालते-बोलते विद्यापीठ

डॉ. वसंत ठाकूर (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस सेवादल) : ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांच्या जाण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी हानी झाली आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. दादा म्हणजे कार्यकर्त्यांचे चालते- बोलते विद्यापीठ होते.

हेही वाचा: Nashik Political News : आगामी निवडणुकीत भाजप- सेना युतीचा भगवा; मुख्यमंत्र्यांना दिला शब्द

कधीही भरून न येणारी हानी

राजाराम पानगव्हाणे पाटील (माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्ष) : ज्येष्ठ काँग्रेस नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्या जाण्याने पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. छाजेड व पानगव्हाणे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

स्वकर्तृत्वाने मोठा झालेला नेता

डॉ. तुषार शेवाळे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्ष) : जयप्रकाश छाजेड म्हणजे राजकारणाची जाण असलेला व स्वकर्तृत्वाने इंटकच्या राज्याध्यक्षपदापर्यंत पोचलेला नेता होता. युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाला बळकटी मिळवून दिली.

जुनेजाणते नेतृत्व हरपले

शरद आहेर (प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस पक्ष) : काँग्रेस पक्षाचे जुनेजाणते नेतृत्व हरपले असून, ही हानी कधीही भरून न येणारी आहे. युवक काँग्रेसपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. त्यांच्या जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Nashik News : गोदावरीच्या पूररेषेत बांधकामाचा मलबा; हरित लवादाची महापालिकेला नोटीस

तीन पिढ्यांनी केली पक्षाची सेवा

शाहू खैरे, (ज्येष्ठ नेते व माजी स्थायी समिती सभापती) : (स्व.) जितमल छाजेडपासून सुरू झालेली काँग्रेस पक्षाची सेवा जयप्रकाश छाजेड यांच्यानंतर तिसऱ्या पिढीतही सुरू आहे. त्यांच्या जाण्याने शहर व जिल्हा काँग्रेस खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे.

सर्वांना सोबत घेणारा नेता

ज्ञानेश्‍वर काळे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस अनु. जाती जमाती) : ज्येष्ठ नेते व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांचा हक्काचा व सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता हरपला आहे. युवक काँग्रेसपासून इंटकपर्यंत त्यांनी केलेले प्रभावशाली कार्य सदैव स्मरणात राहील.

दादांच्या जाण्याने पोकळी

शरद बोडके (जिल्हाध्यक्ष, विमुक्त जाती व भटक्या जमाती) : इंटकच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा लढा उभा केलेल्या जयप्रकाशजींच्या जाण्याने केवळ नाशिकचेच नव्हे तर राज्याचे मोठे नुकसान झाले. तळागाळातील कार्यकर्त्यांला नवी उभारी देणाऱ्या दादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : ATM कार्डची अदलाबदल करून तरुणीला फसविले!