
Market Committee Election Result : नांदगावला ‘शेतकरी विकास’चीच सत्ता! बाजार समितीत 15 जागांवर विजयी
Market Committee Election Result : बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनेलने अठरापैकी पंधरा जागांवर विजय मिळवित पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता राखली आहे. (Nandgaon power of shetkari vikas Won 15 seats in nandgaon Market Committee Election Result nashik news)
आपले वर्चस्व प्रस्थापित करताना पाच माजी आमदारांच्या आव्हानाला त्यांनी हादरा दिला. विरोधी गटाचे मविप्रचे संचालक अमित पाटील व माजी आमदार अँड. अनिल आहेर यांचे पुत्र दर्शन आहेर हे महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले.
हमाल मापारी गटातून अपक्ष असलेल्या नीलेश इप्पर यांनी सलग वीस वर्षे संचालक राहिलेल्या आमदार कांदे गटाचे भास्कर कासार यांचा पराभव केला.
सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही कांदे-कवडे गटाला पंधरा जागा मिळाल्या होत्या. यंदाही त्याच निकालाची पुनरावृत्ती झाली, मात्र तशी होताना माजी सभापती विलास आहेर यांचा झालेला पराभव आमदार गटाला जिव्हारी लागणारा ठरला.
त्यांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक व ‘मविप्र’चे संचालक अमित पाटील यांनी बावीस मतांनी पराभूत केले.
येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील इमारत तीनमधील सभागृहात सांयकाळी पाचला मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी एकूण सहा टेबल मांडण्यात आले होते. माजी आमदार ॲड. आहेर यांचे पुत्र दर्शन आहेर यांच्या राजकीय कारकीर्दीचा या निवडणुकीतून श्रीगणेशा झाला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
व्यापारी गटात दोन जागांसाठी अटीतटीची तिरंगी लढत झाली, त्यात आमदार सुहास कांदे यांचेच समर्थक असलेल्या अमोल नावंदर व गोकुळ कोठारी यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. दोघांनाही समसमान मते मिळाली, मात्र नावंदर हे चिट्ठीवर विजयी झाले.
समाधान पाटील, कैलास पाटील, जीवन गरुड या नव्या चेहऱ्याचा आमदार गटाकडून प्रथमच बाजार समितीत प्रवेश झाला. मंगला काकळीज, अलका कवडे या महिला संचालकांचा पुन्हा एकदा प्रवेश झाला.
विजयी उमेदवार असे
आमदार कांदे गट ः ग्रामपंचायत गटः अनिल वाघ (२७६), अर्जुन पाटील (३०७), दीपक मोरे (३०९), अनिल सोनवणे (३२१). सोसायटी महिला गट ः मंगला काकळीज (३५६), अलका कवडे (३५८). विमुक्त जाती भटक्या जमाती ः पोपट सानप (३३३). सोसायटी सर्वसाधारण ः एकनाथ सदगीर(३०२), कैलास पाटील (३१८), समाधान पाटील (३२०), साहेबराव पगार (२९२), जीवन गरुड (२९१), सतीश बोरसे (३०४), व्यापारी गट ः यज्ञेश कलंत्री (२२०), अमोल नावंदर (१९५).
परिवर्तन पॅनल ः दर्शन आहेर (२९८), अमित पाटील (३०८).