
नारोशंकरची घंटा
हुशार परीक्षार्थी
शिक्षक होण्यासाठी आता फक्त डिग्री नाहीतर त्यासोबत पात्रता परीक्षाही उत्तीर्ण व्हायला हवे. त्यामुळे बऱ्याच वर्षांपूर्वी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो तरी आता पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे.
अशाच एका शिक्षिकेने टीईटी परीक्षा देण्यासाठी शाळेतून बुधवारची सुटी घेतली. सकाळी ८ वाजेलाच पेपर असल्यामुळे सेंटरवर वेळेत पोहोचण्यासाठी यांनी अलार्म सेट केला. सकाळी अलार्म वाजलाही वेळेत.
पण यांनी तो अलार्म बंद केला आणि थोडावेळ झोपू म्हणून लुडकी घेतली. थोड्यावेळातच त्यांच्या मातोश्री येथे प्रकटल्या आणि त्यांनी तू आज सुटी कशासाठी घेतली आहे म्हणून विचारले. तेव्हा या मॅडमच्या लक्षात आले की, आज आपला पेपर आहे. (naro shankarachi ghanta sakal special nashik news)
ताडकन झोपेतून उठल्या आणि थेट परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. पण हॉलतिकिट मात्र घरीच राहून गेलं. ते घेण्यासाठी पुन्हा माघारी फिरल्या. अगदी काही वेळ शिल्लक असताना त्या केंद्रावर पोहोचल्या.
पण हॉलतिकिटची झेरॉक्स काढायची राहून गेली. धावपळ करत फोटोकॉपी दुकानात पोहोचल्या. फोटोकॉपी काढली अन धापा टाकत परीक्षा केंद्रात पोहोचल्या. वेळेत पोहोचल्याचे समाधान त्यांचे चेहऱ्यावर झळकले. पण प्रत्यक्ष पेपर देतानाही वेळेची गडबड झाली आणि २०० पैकी फक्त ९० प्रश्न सोडवून त्या माघारी फिरल्या. आता त्यांना निकालाची प्रतीक्षा लागून आहे.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
मॉल नव्हे -मुला- मुलींचे गप्पा केंद्र
वेळ दुपारीची... सीटी सेंटर मॉलमध्ये वर्दळ तशी कमी. मध्यमवयस्क गृहस्थ मॉलमध्ये खरेदीसाठी दुचाकीने आले. दुचाकी पार्किंग मध्ये आल्यावर त्यांना काही मनाला छेदणाऱ्या गोष्टी दिसल्या. प्रवेश करताना त्यांना त्या टाळल्या.
मात्र, पाऊणतासाने परतल्यावर प्रवेश करतेवेळी जे दृष्य दिसत होते, त्यापेक्षा भयावह चित्र दिसले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना खुणावले. मात्र त्यांनी स्मित हास्य करीत टाळले. मात्र, या गृहस्थाने मनाला न पटणारी गोष्ट बघून दोन दुचाकीवर बसलेले युवक व उभी असलेल्या मुलीस बापाच्या भावनेतून दोन गोष्टी सुनावल्या.
यावेळी दुसऱ्या व तिसऱ्या रो मध्ये गप्पा मारत असलेल्या मुला- मुलींनी मॉलमधून काढता पाय घेतला. यावेळी हा प्रकार नित्याने येथे असतो असे एकाने सांगितले. मग सुरक्षा रक्षक काय करतात, असा प्रश्न उपस्थित झाला. मॉल सुरक्षा रक्षकांनी काही अनर्थ घडू नये, यासाठी अशा गप्पा केंद्रांना घरचा रस्ता दाखवावा एवढेच अपेक्षीत!