नारोशंकराची घंटा : इवलीशी चिमुकली; बससाठी रुसली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Citylinc Latest Marathi News

नारोशंकराची घंटा : इवलीशी चिमुकली; बससाठी रुसली

गंगापूर रोड परिसरातील एका शाळेत असलेली चिमुरडी स्नेहसंमेलन आटोपून आईबरोबर घरी जाण्यासाठी निघाली. सहा-सात वर्षांची या चिमुरडीने मस्तपैकी मेकअप केला होता. मायलेकी अशोकस्तंभ शहर बस थांबा येथे आल्या. (Naroshankarachi ghanta citylinc bus nashik news)

तिला बहुदा भूक लागलेली असावी, आईने तिला पाववडा खाऊ घातला. तो खात ती एकटक सिटीलिंकच्या बस पाहत होती. घरी जाण्यासाठी उशीर होतोय म्हणून लवकर संपव म्हणून आईने दटावले.

तसा तिने पाववडा संपवला आणि आईला म्हणाली, ‘घरी कशाने जायचे?’ ‘सकाळी आलो तसंच, रिक्षाने असे आई उत्तरताच ती म्हणाली, ‘रिक्षाने नको गं, आपण या बसने जाऊ’. रिक्षाने पटकन जाऊ घरी आपण’ असे म्हणत आईने तिचा हात धरला, पण ती काही जागची हलेना अने तोबरा फुगवून तिथेच उभी राहिली.

आईने तिला ओढण्याचा प्रयत्नही केला, शेवटी आई म्हणाली, ‘ठिक आहे, तू इथेच थांब मी जाते’. तरीही ती काही जागेवरून हलली नाही. तिची आई काही अंतर जाऊन रिक्षाच्या आडोशाला थांबली आणि मुलीकडे पाहू लागली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

तरीही ती त्याच जागेवर. आई पुन्हा तिच्याकडे आली, ‘अगं घरी जायला उशिर होतोय. चल लवकर. बस नाहीये आपल्या घराकडे जायला’. तरीही चिमुकलीचे आपले तेच, ‘नाही, मला बसमध्येच बसायचे’. अन आईच्या हाताला झटका देत ती बसथांब्याच्या दिशेने पळाली.

‘काय करावं या पोरीला...’ म्हणत तिची आईही तिच्या मागे धावली. अखेर ‘चल बाई, बसने जाऊ....’ असे जेव्हा आई म्हणाली, तेव्हा मात्र त्या इवलुशा चिमुकलीचा चेहरा मस्त खुलला....