
Nashik @2030 : देशातील सर्वांत मोठे ‘हॉर्टिकल्चर क्लस्टर’!
"जगभरातील आधुनिक तंत्रज्ञान गेल्या २५ वर्षांत नाशिकच्या शिवारात रुजले आहे. शेतकऱ्यांची नवी पिढी इथल्या शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत. द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाजीपाला, टोमॅटोसह कुक्कुटपालन आणि पूरक व्यवसायांनी नाशिकची ओळख देशभरात नव्हे, तर सातासमुद्रापार पोचविली. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा हा कृषिक्षेत्रातील देशातील सर्वांत मोठे ‘हॉर्टिकल्चर क्लस्टर’ म्हणून पुढे आला आहे. नाशिकच्या फलोत्पादनाची ही गती आणि त्यातील संधी पाहता २०३० पर्यंत त्यात आणखी भरीव प्रगती होईल."
- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी (जि. नाशिक)
(Nashik 2030 Largest Horticulture Cluster in country arrticle news)
जागतिकीकरणाच्या पुढील वाटचालीमध्ये देशातील ज्या भागांना संधी आहेत त्यात नाशिक हे सर्वांत पुढे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ‘ॲग्रो क्लायमेटिक झोन’ आणि ३०० मिलिमीटर पाऊस असलेला दुष्काळी पट्टा ते तीन हजार मिलिमीटर पाऊस पडणारा अतिपावसाचा पट्टा इथे आहे.
ही हवामानाची विविधता... विविध प्रकारचे ‘लॉजिस्टिक कनेक्शन्स’ (दळणवळणाच्या यंत्रणा), पुरवठा साखळीशी संबंधित असलेले नानाविध घटक, अवघ्या पाच तासांच्या अंतरावरील मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसारखी आंतरराष्ट्रीय बंदरे या गोष्टी आणि ही भौगोलिक वैशिष्ट्ये नाशिकच्या शेतीसाठी सर्वांत जमेच्या बाबी आहेत.
त्याचअनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील फलोत्पादन क्षेत्र प्रगतीच्या वाटेवर उठून दिसते. द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाजीपाला, टोमॅटो यासोबत कुक्कुटपालन उद्योगाच्या दमदार वाटचालीने देशभरात नाशिकचा ठसा उमटविला आहे.
तंत्रज्ञानाने घडेल बदल!
भविष्यात नाशिक जिल्ह्यातील शेतीमध्ये जे काही बदल घडतील त्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका तंत्रज्ञानाची असेल. जगातील इतर क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञानाने झपाट्याने बदल होताना दिसताहेत. शेतीक्षेत्रातही त्याच गतीने हे बदल होतील.
वेगवेगळ्या प्रकारच्या ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’चा वापर, ‘ॲटोमेशन’ हे शेतीत घडताना दिसेल. या तंत्रज्ञानाच्या वापरात नाशिक जिल्हा अग्रेसर असेल. बाजार समित्यांची पारंपरिक यंत्रणा मोडकळीस आलेली असेल.
तिथे आधुनिक ‘सप्लाय चेन’ व मूल्यसाखळ्या विकसित झालेल्या दिसतील. नाशिक जिल्ह्याने द्राक्ष पिकांत जे काम केले आहे ते अजून पुढच्या टप्प्यावर गेलेले दिसेल. द्राक्षांमध्ये आजमितीस साधारण आठ हजार कोटींच्या दरम्यान उलाढाल होते.
कांदा पिकात तिन्ही हंगाम मिळून नऊ हजार ५०० कोटींची, तर टोमॅटो या महत्त्वाच्या पिकात तीन हजार ५०० कोटींची आणि ‘पोल्ट्री’मध्ये दोन हजार ५०० कोटींची उलाढाल होते. पुढील दहा वर्षांत त्यात लक्षणीय वाढ झालेली दिसेल.
द्राक्षांच्या जुन्या पारंपरिक ‘व्हरायटी‘ नामशेष झालेल्या असतील. त्यांची जागा बदलत्या भौगोलिक परिस्थितीला जुळवून घेणाऱ्या, कमी खर्च असलेल्या आणि ‘मार्केटिंग’ची अधिक क्षमता असलेल्या जाती घेतील.
ग्राहकांच्या चवीचा विचार केलेल्या नव्या आधुनिक जाती नाशिकच्या मातीत रुजलेल्या दिसतील. त्यामुळे बाजाराची क्षमता विस्तारलेली दिसेल. बाजारपेठेमधले जे सध्याचे दोष आहेत ते आधुनिक तंत्रज्ञानामुळे दूर झालेले दिसतील.
गुंते सुटतील...
आशिया खंडात सर्वांत जास्त कांदा पिकविणारा आणि या व्यापारातही सर्वांत पुढे असणारा जिल्हा ही नाशिकची ओळख आहे. त्याच्याभोवती काही राजकारण घडताना आपण नेहमीच पाहतो.
त्यातून कांद्याच्या साठवणुकीसंदर्भातले, भावाबाबतचे प्रश्नांचे गुंते तयार झाले आहेत. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे गुंते सुटलेले दिसतील. कांदा दरातील अस्थिरता कमी होणे व त्यात स्थिरता येणे, हे घडताना दिसेल. कांद्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात फार काम होत नाही. या प्रक्रियेच्या यंत्रणा पुढच्या काळात नक्की दिसतील.
बाजारपेठ विस्तारेल
देशातील व जगातील बाजारात नाशिक जिल्ह्याचा टोमॅटो वर्षातील सहा महिने उपलब्ध असतो. त्याचा विस्तार होऊन तो बाराही महिने बाजारात उपलब्ध होणे, त्याचबरोबर टोमॅटोच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर उभ्या राहणं, टोमॅटोमधील देशातील महत्त्वाचे ‘क्लस्टर’ म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख ठळकपणे होणं, हे पुढच्या काळात घडताना दिसेल.
ॲव्हॅकॅडो, संत्रा, अंजीर यांसारखी फळपिके जिल्ह्यात नव्याने रुजताना दिसतील. जिल्ह्यातील आदिवासी भागात पारंपारिक भात, नागली या पिकांच्या पलीकडे जाऊन या पिकांतील सुधारणा करण्याबरोबर उताराच्या जमिनीवर आंबा, काजू, बांबू ही पिके वाढणे ही काळाची गरज आहे. हे होत असलेले भविष्यात दिसेल.
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे असलेला नाशिक जिल्हा आहे. त्यात धरणांच्या पाण्याचा सर्वांगीण वाटप व वापर करण्यासाठी व त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मोठा वाव आहे. हे भविष्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने घडताना दिसेल.
अर्थकारणाला गती
जगाच्या बाजारात संधी निर्माण होणे, अमेरिकेची बाजारपेठ देशासाठी खुली होणे, चीनच्या मोठ्या बाजारपेठेत अजून भक्कमपणे पाय रोवणे हे पुढच्या दहा वर्षांत घडून आलेले दिसेल. पिकांच्या नव्या जागतिक दर्जाच्या ‘व्हरायटी’, नवं तंत्रज्ञान याचे अनेक नवे टप्पे नाशिकच्या शेतकऱ्यांनी गाठलेले दिसतील.
मुंबईच्या जेएनपीटी ‘कनेक्शन’साठी ‘ड्रायपोर्ट’ उभे राहावे, ही नाशिक जिल्ह्याची मागणी आहे. ती पुढच्या पाच वर्षांत प्रत्यक्षात आलेली असेल. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती मिळालेली दिसेल.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
शेतकरी तरुण पिढीने एकत्र येणे गरजेचे
हे सगळं घडून येण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दूरदृष्टी व विकासाची मूलभूत विचारसरणी असलेली शेतकऱ्यांची नवीन तरुण पिढी पुढे येण्याची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची संस्थात्मक बांधणी होणे गरजेचे आहे.
वैयक्तिक पातळीवर हे घडून आणण्यात अनेक अडचणी आहेत. त्यासाठी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. पूर्ण व्यावसायिकतेने शेतकरी जर एकत्र यायला लागले, तर त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे बदल नक्कीच घडून आलेले असतील, यात काहीच शंका नाही. ‘अमूल’ने दुधात ज्या पद्धतीने व्यवस्था उभारली, तशी फळे व भाजीपाल्यात घडून येणे गरजेचे आहे.
‘सह्याद्री’ने याबाबतीत फलोत्पादन क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांना उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यभरात पीकनिहाय मूल्यसाखळ्यांचे जाळे वाढत जाईल. या पीकनिहाय मूल्यसाखळ्यांना सक्षम करण्यासाठी तशीच ‘इनक्युबेशन’ची व्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. त्यात कॉर्पोरेट, शासन, शेतकरी, शेतीतज्ज्ञ या सगळ्यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
त्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तशा प्रकारची विधायक आणि दूरदृष्टी असलेले कुठल्याही संकुचित राजकारणाच्या पलीकडे विचार असलेले तरुण शेतकरी नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे. भविष्यातील या बदलासाठी शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने सज्ज व्हायला हवे, हे मात्र नक्की!