
नाशिक : क्रीडा गुण सवलती प्रस्तावात निम्म्याने घट
नाशिक : इयत्ता दहावी, बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा स्पर्धांतील कामगिरीच्या आधारे क्रीडा गुण दिले जात असतात. मात्र गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे क्रीडा स्पर्धा प्रभावित झाल्याने या क्रीडा गुण सवलतीच्या प्रस्तावांची संख्या निम्यावर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता दहावीचे एक हजार १३ आणि बारावीचे १४४ असे एकूण एक हजार १५७ प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहेत.
क्रीडा स्पर्धा झाले नसल्याने अशा अपवादात्मक परिस्थितीत तोडगा म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिशानिर्देश जारी केले होते. त्यानुसार दहावीत प्रविष्ट विद्यार्थ्यांबाबत इयत्ता सातवी व आठवीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभागाचा विचारात घेण्याचे सुचविले होते. तर इयत्ता बारावीत प्रविष्ट विद्यार्थ्यांबाबत बारावीपूर्वी नववी व दहावीतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घ्यावा, असे स्पष्ट केले होते.
त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. नाशिक जिल्हास्तरावर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून एकूण एक हजार १५७ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. सामान्य परिस्थितीत विभागाकडे इयत्ता दहावी व बारावीचे प्रत्येकी दोन ते अडीच हजार असे एकूण चार ते पाच हजारांपर्यंत प्रस्ताव प्राप्त होत असे.
दहावीचा निकाल पोचतो शंभर टक्यांपर्यंत
इयत्ता दहावीचा निकाल बेस्ट फाइव्ह अर्थात सर्वाधिक गुण असलेल्या पाच विषयांच्या आधारे जाहीर केला जातो. त्यातच खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण प्राप्त झाल्याने यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्यांपर्यंत पोचलेला आहे.
बारावीतील खेळाडूंना सर्वाधिक फटका
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववी, दहावीच्या कामगिरीच्या आधारे गुण देण्याचे सुचविले आहे. परंतु या क्रीडा स्पर्धांच्या आधारे यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांनी दहावीत सवलत गुणांचा लाभ घेतलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना बारावीत पुन्हा क्रीडा स्पर्धेची कामगिरी ग्राह्य धरली गेलेली नाही. परिणामी बारावीकरीता क्रीडा गुण सवलतीसाठी प्राप्त अर्जांची संख्या अत्यंत तोकडी आहे.
प्राप्त प्रस्तावांची स्थिती
१,०१३ इयत्ता दहावी
१४४ इयत्ता बारावी
Web Title: Nashik Athletes Student Awarded Sport Marks Based On Performance
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..