
Nashik: एसटीमध्ये महिलेची प्रसूती; चालकाची तत्परता बस थेट प्राथमिक केंद्रात
सौंदाणे: गर्भवती महिलेची बसमध्येच प्रसूती झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२) जिल्ह्यात घडली. यावेळी वाहक आणि प्रवासी यांनी महिलेला धीर दिल्याने आणि बसचालक यांनी बस थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत तत्परता दाखविली.
मालेगाव आगारातील नाशिक-मालेगाव बस (एमएच २० जीसी २८३७ ) मधून नाजमीन व आबिद शेख हे पती पत्नी प्रवास करीत होते. सौंदाणे येथील रामदेवजी बाबा परिसरात बस आली असता अचानक नाजमीन शेख यांना प्रसूती कळा सुरु झाल्या.
बस चालक विजय नेरकर, वाहक सुरेखा वाघ व महिला प्रवासी यांनी तत्परता दाखवीत त्या महिलेला धीर दिला. चालक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सौंदाणे येथे संपर्क करून बस थेट केंद्रात घेऊन जायचा निर्णय घेतला. बस वाहक विजय नेरकर यांनी कार्य तत्परतेने बस प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर नेऊन थांबविली.
बसमधील वाहक व महिला प्रवासी तसेच डॉ.अक्षय ततार, डॉ. ऐश्वर्या पानपालिया, आरोग्य सेविका सुरेखा देवरे, श्रीमती. आहेर, उमेश ठोके, राकेश पवार यांनी नाजमीन शेख यांची बसमध्येच सुखरूप प्रसूती केली.
नाजमीन शेख यांचे नाशिक येथील माहेर असून मालेगाव येथील सासर आहे. नाजमीन यांच्या आईचे नाशिक येथे निधन झाल्याने त्या दफनविधी साठी त्यांना नाशिक येथे घेऊन गेले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली.