esakal | नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या पंधराशेच्‍या आत
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या पंधराशेच्‍या आत

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : कोरोनामुक्‍त होणाऱ्या रुग्‍णांची संख्या अधिक राहत असल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत सातत्‍याने घट होत आहे. सोमवारी (ता. १९) जिल्‍ह्यात १२९ पॉझिटिव्‍ह आढळले, तर १८४ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. आठ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ६१ ने घट झाली आहे. दीर्घ कालावधीनंतर जिल्‍ह्यात उपचार घेत असलेल्‍या बाधितांची संख्या पंधराशेपेक्षा कमी झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार ४९३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ५५, नाशिक ग्रामीण क्षेत्रात ७१, तर जिल्‍हाबाहेरील तिघा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने एकही पॉझिटिव्‍ह आढळला नाही. जिल्‍ह्यात नोंदविलेल्‍या आठ मृत्‍यूंमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील चार, तर नाशिक ग्रामीण क्षेत्रातील चार मृतांचा समावेश होता. प्रलंबित अहवालांची संख्या वाढली असून, सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ७६० रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ९७८, मालेगावचे ४८२, तर नाशिक महापालिका क्षेत्रातील तीनशे रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील कोविड रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६२९ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५८० रुग्णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमध्ये ३६, तर मालेगाव क्षेत्रातील १२ रुग्‍ण आहेत.

हेही वाचा: अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द

loading image