
Nashik Kala Katta : सुंदर अक्षर घडविणारे सुलेखनकार नीलेश, पूजा गायधनी
"आजकालच्या इंग्रजाळलेल्या वातावरणात मराठी भाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी समाजातील काही निष्ठावान मराठी भाषाप्रेमी, स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करीत असतात. नाशिकचे सुलेखनकार दांपत्य नीलेश व पूजा गायधनी अशा गुणीजनांपैकी एक. घाटदार, बाकदार आणि वळणदार हस्ताक्षराच्या माध्यमातून साध्या अक्षरलेखनाचे सुलेखनात रूपांतर घडविणारे हे कलाकार. ‘सकाळ’च्या वाचकांशी संवाद साधताना म्हणतात, मराठी अक्षरांकडे केवळ साचेबद्ध पद्धतीने न बघता, त्यातला ओघ आणि प्रवाह यांचा शोध घेणारी कॅलिग्राफी ही एक सुंदर कला आहे. सुलेखन हे मनाशी सुसंवाद साधणारे एक प्रभावी माध्यम तर आहेच, पण त्याही पलीकडे, बुद्धीला स्थिर करणारी ती एक व्यक्त शब्दसाधना आहे." -तृप्ती चावरे-तिजारे.
(Nashik Kala Katta Calligraphers Nilesh Pooja Gaidhani who create beautiful letters interview by trupti chaware tijare nashik news)
सुलेखनात फक्त सुंदर अक्षरात लेखन न करता मजकुराच्या आशयाप्रमाणे, विषयाप्रमाणे आणि अर्थाप्रमाणे लेखन झाले तरच त्याचा प्रभाव वाचणाऱ्यावर होतो. अशा विचारातून आलेले सुंदर व सुडौल अक्षर पाहणे हा सगळ्यांसाठीच दृश्यकला अनुभवण्याचा विषय होतो.
आपले हस्ताक्षर सहज, सुंदर आणि शैलीदार असावे असे प्रत्येकाला वाटते. ‘कॅलिग्राफी’ ही कला, असे मनापासून वाटणाऱ्या अक्षरप्रेमींसाठीच आहे. विख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून त्यांच्या 'मुक्त लिपी' या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करून दिली.
नीलेश आणि पूजा गायधनी हे त्यांचेच विद्यार्थी. सुलेखनातून अनेक कलात्मक आणि कल्पक अक्षर-आविष्कार शोधण्याची सुलेखन कला नाशिकमध्ये रुजावी, वाढावी, यासाठी ते दर्जेदार आणि प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. भाषा कोणतीही असो, तिचे दर्शन हे अक्षरातून घडत असते.
हे दर्शन सुंदर घडावे म्हणून प्रत्येकाच्या मनात या अक्षरांच्या विशिष्ट वळणाची एक कल्पना असते. अक्षरांच्या विविध रचनांचा आणि आकारांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते, की प्रत्येक अक्षराला स्वतःचा असा एक आकार असतो, व्यक्तिमत्त्व असते, सौंदर्य असते.
ते सुलेखनकाराला दिसले की, मग त्याला या अक्षरांच्या विविध आकारांच्या रचनेतून सुंदर अक्षरचित्रे तयार करता येतात. गायधनी दांपत्य या कल्पनेतील सौंदर्याकडे कसे बघायचे, ते शिकविते. स्वतःच काढलेल्या अक्षराला एक विशिष्ट ओळख कशी द्यायची ते शिकवते.
तसेच, कलेशी बोलायचे कसे तेही शिकविते. केवळ हौस म्हणून वरवरचा अभ्यास न करता सुलेखनाच्या अंतरंगात जाऊन पाहिले तर अक्षरांचे सौंदर्य तर खुलतेच, पण त्याबरोबरच, विशिष्ट शब्दांचे वजन आणि सामर्थ्यही वाचकाच्या नजरेत भरते हे गायधनींची ‘कॅलिग्राफी’ बघितल्यावर लक्षात येते.
ज्याला आपण फॉन्ट असे म्हणतो, त्याला ते अक्षरसाधना मानतात. सुलेखनाच्या योग्य सरावातून अक्षरांचा सांभाळ आणि सौंदर्यविकास करायला शिकविणारे हे कलाप्रेमी दांपत्य मराठी भाषा प्रांतात स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत आहेत.
विविध वळणे व अक्षररूपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करून आपल्या सुलेखनाद्वारे सगळ्यांवर मोहिनी टाकणाऱ्या गायधनी दाम्पत्याने नुकताच लहान मुलांच्या मनोविकासासाठी ‘मनाच्या श्लोकाचा’ ‘सुलेखन याग’ हा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. विश्वविक्रमी ठरलेला हा प्रयोग पावणेतीनशे विद्यार्थ्यांच्या सुलेखन साहाय्याने पार पडला.
या सगळ्या विद्यार्थ्यांना गायधनींनी अवघ्या काही दिवसातच सुलेखनात तयार केले. सुलेखन याग ही अक्षर संस्कार संकल्पना अलका चंद्रात्रे यांची होती. ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी ‘चारचौघं’ या संस्थेने, म्हणजेच, सी. एल कुलकर्णी, एन. सी. देशपांडे, विनायक रानडे आणि समीर देशपांडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
सुलेखनातून ‘बैठक’
‘सुलेखनातून तणावमुक्ती’ ही अभिनव कल्पना यशस्वीपणे राबविताना ते म्हणतात, सुलेखनातून ‘बैठक’ मिळते. या बैठकीत सुलेखनकार विशिष्ट पद्धतीने, पंचेचाळीस अंशाच्या कोनात, सुलेखनाची विशिष्ट लेखणी घेऊन जेव्हा बसतो, तेव्हा त्यातून या कलेसाठी लागणारे तंत्र तर विकसित होतेच पण त्यातून एकाग्रतेचा मंत्रही मिळतो.
शाई आणि बोरूपासून उत्क्रांत होत, कॅलिग्राफीक पेनपर्यंत, शरीर, मन आणि बुद्धीला, कलात्मक पद्धतीने योग्य वळण देणारी अशी ही अनोखी कला. सहजातून साधलेली आणि सहजात विसावणारी. गायधनी दांपत्याच्या कार्याने नाशिकच्या कलाभूमीत ही कला बहरते आहे ही अभिमानाची बाब आहे.