esakal | Jayant Patil : "महापालिका निवडणुकीत यश मिळवून भुजबळांच्या नेतृत्वाखाली पुढे नेऊ विकास"
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका निवडणुकीत यश मिळवून भुजबळांच्या नेतृत्वाखाली पुढे नेऊ विकास

महापालिका निवडणुकीत यश मिळवून भुजबळांच्या नेतृत्वाखाली पुढे नेऊ विकास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळवून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली रखडलेला विकास पूर्ण करू, अशी ग्वाही रविवारी (ता. ३) येथे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच लोकमान्यतेतून संधी आपोआप चालून येते, असेही सांगायला ते विसरले नाहीत. जयशंकर लॉन्समध्ये झालेल्या परिवार संवाद यात्रेत ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर,विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते.

बूथ कमिट्यांची ‘टीम’ सक्षम असेल, तर अपयश येणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ कमिटीपासून काम करावे, असे सांगून पाटील म्हणाले, की पक्षाकडून आता सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची नोंद ठेवली जाईल, यासाठी पक्षाकडून व्यवस्था करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी बोलत व्हावे, यासाठी ही परिवार संवाद यात्रा होत आहे. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भावनांची नोंद यातून घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे.

भुजबळ आणि कुटुंबीयांना खोट्या आरोपात अडकविण्यात आले. त्याबद्दल त्यांना २७ महिने तुरुंगवास भोगावा लागला. आता निकाल हाती आला असून, त्यात त्यांना व कुटुंबांना निर्दोष मुक्त करण्यात आले, असे सांगून पाटील यांनी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याची खंत व्यक्त केली. नाशिकच्या विकासात भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत विकास त्यांनी केला आहे. नाशिक शहरात उड्डाणपूल करून शहरातील वाहतुकीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मेहनत घ्या, यश नक्कीच

जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करायचे असेल, तर घाबरून चालणार नाही. कितीही संकट आली तरी मागे फिरून चालणार नाही. संकट येणार संकट जाणार; परंतु आपण लढलं पाहिजे. निवडणूक जिंकण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. मेहनत घेतली, तर यश नक्कीच आपलं आहे, असे सांगत भुजबळ यांनी निवडणुकांच्या तयारीला लागावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, की निवडणुकांना सामोरे जात असताना मतदारयादी पडताळणी पाहून आपले काम सुरू व्हायला पाहिजे. निवडणुका जाहीर होतील तेव्हा होतील, मात्र आपण आतापासून तयारीला लागले पाहिजे. बोगस मतदान टाळण्यासाठी मतदार याद्यांमधील दुबार नावे असतील, त्याची पडताळणी करून तक्रारी दाखल कराव्यात. आपल्या लोकांच्या विरोधात काही कटकारस्थान केले जातं असेल, तर आदेशाची वाट न बघता लढले पाहिजे.

प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. माजी आमदार जयवंतराव जाधव, डॉ. अपूर्व हिरे, श्री. शेख, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, माजी आमदार पंकज भुजबळ, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, सचिन पिंगळे, बाळासाहेब कर्डक, नगरसेवक गजानन शेलार, जगदीश पवार, समिना मेमन, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धन आदी उपस्थित होते.

loading image
go to top