esakal | महापालिका १० हजार रेमडेसिव्हिर खरेदी करणार; स्थायी समितीचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Nashik-Municipal
महापालिका १० हजार रेमडेसिव्हिर खरेदी करणार; स्थायी समितीचा निर्णय
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने तुटवड्यामुळे रुग्णांना जीव गमावावा लागत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने यापूर्वी रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या दिलेल्या दहा हजार ऑर्डरमध्ये आणखी दहा हजार इंजेक्शन वाढविण्यात आले असून, महापालिकेबरोबरच इतर रुग्णांनादेखील सहज महापालिकेच्या माध्यमातून इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

स्थायी समितीच्या सभेत शहरातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवड्यावर चर्चा झाली. कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण भरती झाले. प्रारंभी बेडचा तुटवडा भासला, त्यानंतर ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेडची कमतरता भासली. एक समस्या सुटत नाही, तोच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासला. इंजेक्शन काळ्या बाजारात विकले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. नगरसेवक राहुल दिवे यांनी इंजेक्शनसाठी आगाऊ पैसे देऊनही इंजेक्शन मिळत नसल्याची बाब निदर्शनास आणली. प्रतिभा पवार यांनी महापालिकेच्या रुग्णालयांसाठी कोट्यवधींची खरेदी करूनही इंजेक्शन रुग्णांना दिले जात नसल्याचा आरोप केला. नगरसेवक सलीम शेख यांनी ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन नागरिकांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार खरेदीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बिटको रुग्णालयात मानधनावर सेवा बजावताना कोरोनामुळे मृत पावलेल्या डॉ. पंकज वसावे यांच्या वारसांना पाच लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय सभापती गिते यांनी घेतला.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

साडेचार हजार इंजेक्शन प्राप्त

मायलॉन कंपनीकडे महापालिकेने दहा हजार इंजेक्शनची मागणी नोंदविली असून, त्यातील साडेचार हजार इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. महापालिका रुग्णालयांमध्ये सरासरी चारशे इंजेक्शन रोज लागतात. इंजेक्शनची मागणी वाढत असल्याने मायलॉन कंपनीला शासनाने दिलेला कोटा मर्यादित असल्याने सिप्ला कंपनीकडून आणखी दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी करण्याचे आदेश सभापती गिते यांनी दिले.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा