esakal | Nashik : आयटी कंपन्यांसाठी महापालिकेचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

IT Company
नाशिक : आयटी कंपन्यांसाठी महापालिकेचा पुढाकार

नाशिक : आयटी कंपन्यांसाठी महापालिकेचा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक - शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असताना राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हवा तसा औद्योगिक विकास झालेला नाही. त्यामुळे नाशिक शहरात माहिती व तंत्रज्ञानावर आधारित (आयटी) कंपन्या स्थापन करण्याच्या दृष्टीने ब्रॅन्डिंग करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून, नियोजनासाठी महापौरांच्या रामायण बंगल्यावर बैठक झाली. तीत आयटी कंपन्यांच्या कॉन्फरन्ससाठी दहा तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली.

नाशिकमध्ये पायाभूत सुविधा असूनही पाहिजे तसा औद्योगिक विकास नाशिकमध्ये इतर शहरांच्या तुलनेत झालेला नाही. त्यामुळे नाशिक शहराचे ब्रॅन्डिंग कशा पद्धतीने करता येईल, मोठमोठ्या आयटी कंपनी येण्यासाठी काय केले पाहिजे, या विषयांवर चर्चा झाली. यासाठी दहा तज्ज्ञांची समिती सविस्तर काम करणार आहे. शहरातील निमा, आयमा व इतर क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांनाही बरोबर घेणार असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. शहरात दीडशेहून अधिक आयटी कंपन्या आहेत. नवीन कंपन्या स्थापन झाल्यास त्यातून शहर आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. शहरातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते रोजगारानिमित्त मुंबई, पुणे, बेंगळुरू शहरात जातात. नाशिकमध्ये रोजगार मिळाल्यास शहर विकासाला निश्‍चित हातभार लागेल, असा विश्‍वास महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: होर्डिंग नियमावलीमुळे पोस्टर पुढाऱ्यांना चाप

जऊळके शिवारात व्हावे हब

नाशिक शहरालगतच्या जऊळके शिवारात साधारण ३०० एकर जागा आयटी हबसाठी आरक्षित आहे. त्या जागेवरही भविष्यात आयटी हब साकारता येईल. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात काही जागा आयटी कंपन्यांपासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी उपस्थितांनी केली. नगरसेवक हिमगौरी आहेर-आडके, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष संध्या कुलकर्णी, एनआयटीचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी, नेवीन इन्फो सोल्यूशन प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष अरविंद महापात्रा, विनजित टेक्नॉलॉजीचे मकरंद सावरकर, मॅग्न्युसाईड प्रा. लि.चे नदीम शेख, गिरीश पगारे, हृषिकेश वाकुडकर, शशांक वाघ, विशाल जाधव, इएसडीएसचे विशाल जोशी, ॲसेसचे संजय कोठेकर, जेएमएन इन्फोटेकचे अभिषेक निकम आदी उपस्थित होते.

loading image
go to top