
Nashik Leopard News : सिन्नर परिसरात जखमी बिबट्याचा मृत्यू
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील दहिवाडी येथे रविवारी (ता. 12) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दोन ते अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या बिबट्याच्या पोटात संरक्षक कुंपणाची तार घुसल्यामुळे तो जखमी झाला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून अंगावर जखम घेऊन तो वावरत होता.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दहिवडी येथील रामभाऊ निवृत्ती बरके यांचे मालकीचे गट नंबर 92 मध्ये मक्याच्या शेतात बिबट्या असल्याची माहिती सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांना मिळाली होती.
त्यांच्या सूचनेनुसार वनपाल सुजित बोकडे, वनरक्षक वत्सला कांगणे, वन कर्मचारी मधुकर शिंदे, बालम शेख, रोहित लोणारे, नारायण वैद्य यांनी दहिवडी येथे धाव घेतली. पाठोपाठ नाशिक येथून पश्चिम विभागाचे उपवन संरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बचाव पथक देखील रवाना करण्यात आले.
बरके यांच्या घराशेजारीच असलेल्या मक्याच्या शेतातून दुपारपासून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या त्यामुळे भयभीत झालेल्या कुटुंबीयांनी याबाबतची माहिती वनविभागास कळवली होती. वनविभागाच्या पथकाने मक्याचे शेतात पाहणी केल्यानंतर अखेरचा घटका मोजत असलेला बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला.
रेस्क्यू पथकातील सदस्यांनी या बिबट्याला उपचारासाठी हलवण्याची तयारी केली. मात्र काही मिनिटात त्याने शेवटचा श्वास घेतला. या बिबट्याच्या पोटावर गोलाकार जखम झाली होती. ही जखम खोलवर असल्याने व सेप्टिक झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
घटनास्थळी पंचनामा केल्यावर बिबट्याचे शव शवच्छेदनासाठी सिन्नर येथे नेण्यात आले. तेथे तपासणी करताना बिबट्याच्या पोटातून तारेचा तुकडा बाहेर काढण्यात आला. कदाचित एखाद्या ठिकाणी संरक्षक कुंपणात अडकून हा बिबट्या जखमी झाला असावा.
त्याने सुटका करून घेताना जोर लावल्याने तुटलेली तार तशीच त्याच्या पोटात अडकली. व जखम वाढत जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वनविभागाच्या वतीने या बिबट्यावर मोहदरी वन उद्यानात दहन करून अंतिम संस्कार करण्यात आले.