
Nashik News: येवल्यात कांदयाला अग्नीडाग देत केली होळी साजरी!
Yeola News : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून हे पीक घेण्यासाठी गुंतवलेले भांडवलही मिळेनासे झाले आहे. यामुळे वैतागलेल्या मातुलठाण येथील शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दराचा गोंधळ वाढला असून यावर्षीच्या हंगामात तर मातीमोल दराने कांदा विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
घसरलेल्या दरामुळे नाशिक जिल्ह्यात ठीकठिकाणी आंदोलने होत असून शेतकऱ्यांचा उद्रेक सुरू आहे. रविवारी तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नी घेराव घालत जाब विचारला होता.
गेल्या दोन महिन्या पासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.कांदा भाव घसरणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होळीचे औचित्य साधून मातुलठाण येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन आगळेवेगळे आंदोलन केले.
कांद्याच्या भावात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली मात्र तरी देखील भावात सुधारणा झाली नाही.त्यामुळे डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतात ठिकठिकाणी सरण रचून कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला.
शासनाने आता तरी दखल घेऊन कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा तसेच यावर्षीच्या हंगामात विक्री केलेल्या कांद्याला हजार रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी डोंगरे यांनी केली आहे.
- संतोष विंचू,येवला