
Nashik News: बदल्यांच्या खेळात नाशिककर बेहाल! नागरिकांचा शुक्रवारपासून तक्रारींचा पाढा
Nashik News : विभागीय कार्यालयात सिडकोवासीयांच्या विविध तक्रारी नोंदवून घेण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
मात्र येथील कर्मचाऱ्याची बदली झाल्याने १९ मे पासून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एकही कर्मचारी अथवा अधिकारीच उपलब्ध नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने बदल्यांच्या खेळात नाशिककर बेहाल होत असल्याची स्थिती आहे. (Nashik people in tension about employees transfer game Read complaints of citizens from Friday Nashik News)
ड्रेनेज, पाणी, पथदीप, रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मनपा प्रशासनाने विभागीय कार्यालय उभारून दिले आहे. यातील तक्रार निवारण कक्षात सिडकोवासिय फोन करून व प्रत्यक्ष येऊन त्यांच्या तक्रारी देत असतात.
मात्र १९ मे पासून सिडकोवासीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपलब्ध नसल्याने त्यांची चांगलीच परवड झाली आहे.
सिडको विभागीय कार्यालयात विविध विभाग असून प्रत्येक विभागास स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक देखील असायला हवी, मात्र एका अधिकाऱ्यावर अतिरिक्त भार दिल्याने येथे दिवसभर कोण अधिकारी काम करतात, हे देखील स्पष्ट होत नाही.
कार्यालयात असणारा शुकशुकाट बघता कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यास संबंधित अधिकारी दुसऱ्या कामास बाहेर गेल्याचे कारण देत असल्याचा सिडकोवासीयांचा अनुभव आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अधिकाऱ्यांना अतिरिक्त कामकाज
सिडको विभागीय कार्यालयातील सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांना अतिरिक्त सातपूर विभागीय कार्यालय सांभाळावे लागत आहे. येथील बांधकाम अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी, ड्रेनेज विभाग अधिकारी यांना देखील अतिरिक्त कामकाज दिले गेले आहेत.
चौथ्या दिवशी खोळंबली कामे
तक्रार निवारण कक्षात शुक्रवारी (ता. १९) तक्रार घेण्यासाठी कोणीच कर्मचारी नव्हते. शनिवार व रविवार असल्याने कार्यालयास सुट्टी तर सोमवारी (ता. २२) येथे कोणीही उपलब्ध नसल्याने सिडकोवासीयांना चौथ्या दिवशीही ताटकळत थांबावे लागले आहे.
"येथील कर्मचारी यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अजून ते कामावर रुजू का झाले नाही याबाबत चौकशी करून त्वरित कर्मचारी नेमणूक करण्यात येईल." - डॉ. मयूर पाटील सिडको विभागीय अधिकारी
"सिडको विभागीय कार्यालयात काही कामानिमित्त आल्यानंतर अनेकदा अधिकारी जागेवर उपलब्धच नसतात. विचारपूस केली असता अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामकाज असल्याचे सांगण्यात येते. आमच्या समस्या सोडविण्यासाठी कोणाकडे जावे हा प्रश्न आहे."
-किरण राजवडे, स्थानिक नागरिक
"परिसरातील समस्यांसाठी तक्रार निवारण कक्षात नागरिकांनी फोन केला असता तो फोन कुणी उचललाच नाही. प्रत्यक्ष तक्रार करण्यासाठी गेल्यानंतरही येथे तक्रार घेण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. समस्या सोडविण्यासाठी आता राजीव गांधी भवन येथे तक्रारी कराव्यात का हा प्रश्न आहे." - वैभव देवरे, स्थानिक नागरिक