Officers Transfer: पोलीस आयुक्त शिंदे यांना बदलीचे वेध; पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदावर लक्ष्य? | Nashik Police Commissioner Shinde seeks transfer Aiming for an important post in western Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Commissioner of Police ankush shinde

Officers Transfer: पोलीस आयुक्त शिंदे यांना बदलीचे वेध; पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदावर लक्ष्य?

Nashik Officers Transfer : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी नाशिक पोलीस आयुक्तपदी विराजमान झालेले अंकुश शिंदे यांना बदलीचे वेध लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते बदलीसाठी प्रयत्नशिल होते.

त्यामुळे त्यांची पश्‍चिम महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर बदली होणार असल्याचे विश्‍वसनिय सूत्रांकडून समजते. (Nashik Police Commissioner Shinde seeks transfer Aiming for an important post in western Maharashtra)

आयुक्त शिंदे यांनी गेल्या १६ डिसेंबर २०२२ला पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. नाशिक शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करतानाच त्यांनी शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे म्हटले होते.

परंतु, त्याचवेळी त्यांना बदलीचेही वेध लागले होते. मधल्या काळात दोन ते तीन वेळा गृह विभागाने आयुक्त तथा विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यावेळीही आयुक्त शिंदे यांनी बदलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.

येत्या काही दिवसांत पुन्हा राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पातळीवर बदल्या होण्याची चिन्हे असून, आयुक्त शिंदे हे काही दिवसांपासून सातत्याने बदलीसाठी प्रयत्नशिल आहेत. यावेळी त्यांची बदली निश्‍चित मानली जात असून, पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे पद त्यांना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. शिंदे हे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त असताना त्यांची तडकाफडकी नाशिकमध्ये बदली झाली. त्यामुळे ते नाशिकमध्ये येण्यास सुरवातीपासूनच नाखुश असल्याचे बोलले जाते. नाशिकला बदली झाल्यानंतरही त्यांनी तीन-चार दिवसांनी पदभार स्वीकारला होता.

तेव्हाही ते आयुक्तपदाची जबाबदारी घेणार नाहीत, अशीच चर्चा पोलीस वर्तुळात होती. परंतु, त्यांची पर्यायी पदस्थापना होण्याची कोणतीच चिन्हे न दिसल्याने अखेर नाईलाजास्तव त्यांना नाशिक आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारावी लागल्याचे बोलले जात होते.