
Nashik Police Commissionerate: मोनिका राऊत यांनी स्वीकारला पदभार; तांबे, जाधव, बारी यांची प्रतिक्षा कायम
Nashik Police Commissionerate : गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त प्रशासन व मुख्यालय उपायुक्तपदाची जबाबदारी नवनियुक्त पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी स्वीकारली आहे.
तर, नाशिक विभाग तीनच्या रिक्त सहायक आयुक्तपदाची जबाबदारी शेखर देशमुख यांनीही घेतली आहे. मात्र, अद्यापही नाशिक आयुक्तालयात बदली झालेले तीन सहायक पोलिस आयुक्त रुजू झालेले नाहीत. (Nashik Police CommissionerateMonika Raut taken charge Waiting for Tambe Jadhav Bari nashik news)
गेल्या महिन्यात राज्यातील पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या गृहविभागाच्या आदेशान्वये करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार अकोल्याच्या अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांची नाशिकला उपायुक्तपदी तर, सहायक आयुक्त पदावर नाशिक ग्रामीणमधील निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेतील शेखर देशमुख, बृहन्मुंबईतून नितीन जाधव, चिपळूणच उपविभागीय अधिकारी सचिन बारी तर, नाशिक आयुक्तालयातीलच डॉ. सीताराम कोल्हे यांची बदली करण्यात आलेली होती.
यात डॉ. कोल्हे हे तत्काळ रुजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिक पोलिस आयुक्तालयात रुजू झालेल्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडे आयुक्तालयातील प्रशासन व मुख्यालयची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
तत्कालीन पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांची बदली झाल्याने गेल्या तीन- साडेतीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. त्याची अतिरिक्त जबाबदारी शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्याकडे देण्यात आलेली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर, सहायक आयुक्त शेखर देशमुख हेही दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयात रुजू झाले असून, त्यांच्याकडे नाशिक विभाग तीनची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीण निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्यासह सचिन बारी, नितीन जाधव हे आयुक्तालयात रुजू झालेले नाहीत.
याच महिनाअखेरीस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त वसंत मोरे, आणि नाशिक विभाग चारचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे हेही सेवानिवृत्त होत आहेत.
सध्या आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा, नियंत्रण कक्ष येथील सहायक आयुक्त पद रिक्त आहेत. त्यामुळे तांबे, बारी, जाधव हे रुजू झाल्यानंतरच नव्याने जबाबदारीची फेररचना केली जाण्याची शक्यता आहे.