
Nashik Rangpanchami 2023 : रंगपंचमीला रहाड जवळ तोबा गर्दी, नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठी चार्ज
जुने नाशिक : रहाड रंगोत्सवाचा (Nashik Rangpanchami 2023) आनंद घेण्यासाठी रंगप्रेमींनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.
तीवंदा भागातील रहाडीच्या ठिकाणी प्रकार घडला. (Nashik Rangpanchami 2023 Police baton charge to prevent a large crowd to enjoy Rahad Rangotsav from creating stampede situation nashik news)
रंगपंचमी निमित्ताने पारंपारिक रहाड रंगोत्सचा मनमुराद आनंद घेण्यासाठी शहराच्या विविध भागातील रंगप्रेमींनी पाचही रहाडीच्या ठिकाणी गर्दी केली होती. तीवंदा चौकातील रहाडीवर मात्र अधिकच गर्दी झाली होती. तब्बल दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त रहाड रंगोत्सव होत असल्याने रंगप्रेमींनी रहाडीच्या चारही बाजूंनी गर्दी केली होती.
रंग खेळण्यासाठी जमलेले रंगप्रेमी एकमेकांना धक्काबुक्की करत पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेटिंगही त्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला. चेंगरा चेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दुर्घटना होऊ नये, यासाठी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. नागरिक ऐकत नसल्याने शेवटी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
रंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आलेल्यांना लाठीचा प्रसाद भेटल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. अन्यथा मोठी आपत्कालीन परिस्थिती ओढवली असती. भद्रकाली पोलीस आणि होमगार्ड यांच्या समय सुचकतेमुळे गर्दीवर नियंत्रण तर मिळालेच चेंगराचेंगरीची घटनाही टळली.
पोलिस आणि होमगार्डच्या याकर्तव्यदक्षतेमुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत झाल्याने आयोजक मंडळाचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले. असे जरी असले तरी रहाड रंगोत्सवास गालबोट लागले. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी रंगपंचमी उत्साहात साजरी झाली.