नाशिकचा उन्हाळ कांदा निघाला लंडनला! हॉलंडसह चीनचीही मागणी

onion sakal 123.jpg
onion sakal 123.jpg

नाशिक : नाशिकचा उन्हाळ कांदा लंडनला निघाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत उन्हाळ कांद्याचा भाव क्विंटलला सरासरी ८०० ते एक हजार १५१ रुपयांपर्यंत घसरल्याने गेल्या महिन्यापूर्वीच्या तुलनेत निर्यातीच्या भावात निम्म्याने घसरण झाली आहे.

हॉलंडसह चीनमधून कांद्याची मागणी

 देशाच्या दक्षिणेतून कांद्याची आवक वाढली आहे. पश्‍चिम बंगालमधील कांद्याची आवक अंतिम टप्प्यात पोचली आहे. गुजरातचा कांदा एप्रिलच्या अखेरीस संपणार आहे. त्याच वेळी नाशिकच्या कांद्याशी टक्कर देणाऱ्या मध्य प्रदेशातील गावठी कांद्याची आवक सुरू झाली आहे. शिवाय पाकिस्तानचा कांदा अंतिम टप्प्यात पोचला असून, त्याचा टनाचा भाव २५० ते २८० डॉलर इतका आहे. सद्यःस्थितीत नाशिकच्या कांद्याला २५० ते ३५० डॉलर प्रतिटन असा निर्यातीला सरासरी भाव मिळत आहे. विशेष म्हणजे, कांद्याची निर्यात करणाऱ्या हॉलंडसह चीनमधून कांद्याची मागणी वाढली आहे.

अरब राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा कांदा

विशेषकरून अरब राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा कांदा विकला जात आहे. पूर्वी लंडनचे व्यापारी हॉलंडमधून भारतीय कांदा विकत घ्यायचे. अलीकडच्या काळात लंडनच्या व्यापाऱ्यांनी थेट नाशिकहून उन्हाळ कांद्याची मागणी सुरू केली आहे. लंडनसाठी टनाला ३८० पौंड इतका भाव आहे. त्यामागे कारणही तसे आहे. आता द्राक्षांचा हंगाम जोरात सुरू असून, युरोपियन देशांमध्ये द्राक्षे पाठविण्यासाठी कंटेनरची मागणी वाढल्याने एका महिन्यात कांद्यासाठी लागणाऱ्या कंटेनरचे भाडे तीन हजार डॉलरवरून पाच हजार डॉलरपर्यंत पोचले आहे. कंटेनर उपलब्धता वाढून भाडे कमी होताच, लंडनच्या ग्राहकांना आणखी कमी भावात नाशिकचा कांदा खाणे शक्य होणार आहे. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

लाल कांदा करू लागलाय वांधा 
आर्थिक वर्षअखेरीनिमित्त कांद्याचे खरेदी-विक्रीचे व्यवहार आठवडाभर बंद राहतात. मात्र लाल कांद्याची आवक तोपर्यंत संपत आलेली असते. निसर्गाच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका कांदा उत्पादकांना गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलपर्यंत लाल कांद्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात होत राहिली. कांद्याचे आगर असलेल्या लासलगावमध्ये एक लाख ३२ हजार क्विंटलची आवक एप्रिल २०२० मध्ये झाली होती. त्याच वेळी साडेतीन लाख क्विंटलहून अधिक उन्हाळ कांद्याची विक्री झाली होती. मात्र लाल आणि उन्हाळ कांदा बाजारात विक्रीसाठी येत राहिल्याने एप्रिल २०२० मध्ये क्विंटलला सरासरी उन्हाळला ९४५, तर लाल कांद्याला ६६८ रुपये असा भाव मिळाला होता. यंदा १ ते २३ मार्चपर्यंत लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याची ३४ हजार ३५४ क्विंटल, तर लाल कांद्याची साडेतीन लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. उन्हाळ कांद्याला २३ दिवसांमध्ये सरासरी एक हजार ४६५, तर लाल कांद्याला एक हजार ५४२ रुपये क्विंटल असा भाव मिळाला असला, तरीही मंगळवारी लासलगावमध्ये उन्हाळ कांदा सरासरी ९०० आणि लाल कांदा ८०० रुपये क्विंटल या भावाने विकला गेला.

जिल्ह्यातील लाल कांद्याचे पावसाने नुकसान केल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी लाल कांद्याची लागवड केल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एप्रिलच्या अखेरीपर्यंत लाल कांद्याची आवक राहणार हे स्पष्ट झाले आहे. परिणामी, लाल कांदा संपल्यानंतर उन्हाळ कांद्याचे भाव स्थिरावण्यास आणि त्यात किलोला दोन ते तीन रुपयांनी वाढ होण्याची स्थिती सध्या दिसते आहे. अर्थात, एप्रिलनंतर उन्हाळ कांद्याच्या साठवणुकीला होणारी सुरवात भावातील वाढीसाठी हातभार लावते. दरम्यान, भारतातील कांद्याच्या निर्यातीच्या अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेश सरकारच्या कृषी मंत्रालयाने आपल्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासाठी सबसिडी देण्यास सुरवात केली आहे. त्याच वेळी भारतीय कांद्यावर ५ टक्के आयातशुल्क लागू केले आहे. बांगलादेशमधील कांदा येत्या १५ दिवसांमध्ये संपणार असल्याने त्यानंतर बांगलादेशमधील कांद्याची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. 

कांद्याच्या निर्यातीचा भाव 
(आकडे टनाला डॉलरमध्ये) 
० सिंगापूर- ३५० 

० मलेशिया- ३०० 
० हॉलंड- ४२० ते ४४० 
० चीन- ३४० 
० श्रीलंका- ३०० 
० फिलिपीन्स- ३४० ते ३६० 
० दुबई- ३०० 
(निर्यातदारांनी दिलेली माहिती) 

नाशिकमधील कांद्याच्या आजच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 
बाजारपेठ लाल उन्हाळ 
मुंगसे ८२५ ८५० 
चांदवड ८७५ १ हजार 
मनमाड ८०० ८०० 
देवळा ९५० १ हजार 
पिंपळगाव बसवंत १ हजार २५ १ हजार १५१ 

 

निर्यातीच्या बदल्यात वाहतूक आणि साहित्यासाठी केंद्र सरकारकडून निधी किती मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यातच, आर्थिक वर्षअखेरीमुळे बंदरात कंटेनर प्रवेशासाठी प्रतीक्षा वाढल्याने उन्हाने कांद्याचे नुकसान होण्याची भीती वाढली आहे. शिवाय २०१८ मध्ये बंदरात नाशवंत माल म्हणून भाजीपाला आणि फळांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची तयारी केंद्राने दर्शविली होती. त्याचीही पूर्तता झाली नाही. निर्यातदारांच्या या प्रश्‍नांचा विचार केंद्र सरकारने करायला हवा. 
-विकास सिंह (कांद्याचे निर्यातदार) 
... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com