
Nashik ZP: वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी तब्बल 641 अर्ज; प्राप्त अर्जांपैकी 349 प्रमाणपत्राची होणार पुनर्तपासणी
Nashik ZP : जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदल्यांमध्ये सोईची बदली व्हावी, यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रांचा आधार घेतला जात असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. बदली प्रक्रीया सुरू झाल्याने गत महिनाभरात जिल्हा रुग्णालयात सुमारे ६४१ अर्ज प्राप्त झाला आहेत.
त्यापैकी ११५ अर्ज पात्र करण्यात आले असून, ५३ अर्ज अपात्र करण्यात आले आहे. तर, तब्बल ३४९ अर्ज धारकांना पुनर्तपासणी केली जाणार आहे. अर्जांमध्ये बाह्य जिल्ह्यातील ७६ अर्जाचा समावेश आहे. (Nashik ZP 641 applications for medical certificate Out of applications received 349 certificates will be re examined)
गतवर्षी जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालयातून आंतरजिल्हा बदलीसाठी काही पोलिस अंमलदारांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. यात जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यापासून ते अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकारामुळे प्रत्येक विभाग खडबडून जागा झाला असून, बदल्यांसाठी आरोग्य प्रमाणपत्र जोडताना त्यांची शहनिशा करून घेत आहे. जिल्हा परिषदेतील गत तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली बदली प्रक्रिया सुरु होणार असल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेतील कर्मचारी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गर्दी सुरू केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्हा रुग्णालयात ६४१ अर्ज प्राप्त झाले असले तरी त्यापैकी ३४९ म्हणजे ५५ टक्के कर्मचाऱ्यांच्या अर्जाबाबत खात्री वाटत नसल्याने त्यांना पुनर्तपासणीसाठी बोलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर अवघे ११५ अर्ज पात्र करण्यात आले आहेत.
या अर्जांचे अभिप्राय जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या अर्जाबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.