
Nashik National Lok Adalat : तडजोडीअंती 66 कोटींची वसुली; 22 हजार प्रकरणांचा निपटारा
नाशिक : जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे ६६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
या वेळी प्रलंबित व दावा दाखल पूर्व प्रकरणांचा राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २२ हजार २८६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
वीजचोरीशी संबंधित पाच प्रलंबित प्रकरणांत तडजोडीअंती पाच पक्षकारांना दिलासा मिळाला, तर दाखल १२० कौटुंबिक प्रकरणांमध्ये तडजोडीनंतर सर्वच्या सर्व १२० दावे मिटल्याने त्यांचे संसार पुन्हा फुलविण्यात यश आले. (Nashik National Lok Adalat Recovery of 66 crores after settlement of 22 thousand cases nashik news)
नाशिक जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दाखल करण्यात आलेल्या मोटार अपघाताची ९३९ पैकी २६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
अपघातांमध्ये मृत झालेल्यांच्या वारसदारांना नुकसानभरपाईची रक्कम या वेळी देण्यात आली. नाशिक रोड येथील मोटार वाहन न्यायालयात दाखल तीन हजार २८७ पैकी ३१८ प्रकरणे निकाली काढली.
जिल्हा ग्राहक मंचासमोरील सहा प्रकरणांमध्ये तडजोड झाली, तर दावा दाखलपूर्व एक लाख ३५ हजार ५७१ प्रकरणे न्यायालयासमोर ठेवण्यात आली. त्यापैकी १९ हजार ११७ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
त्यामध्ये १५ कोटी ७८ लाख ४४ हजार २८९ रुपयांची वसुली झाली. या लोकअदालतीचे संयोजन प्राधिकरणाचे सचिव न्या. शिवाजी इंदलकर आणि वकील परिषदेचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह सर्व अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी केले.
प्रकरणे - निकाली
धनादेश न वटणे- १,०८४
मोटार अपघात - २६५
कौटुंबिक वाद - १२०
फौजदारी तडजोड - ४८४
अन्य - १,२०७
कामगार विषयक - नऊ
एकूण - ३,१६९