NDCC Bank Recovery : ते पत्र पडतंय भारी! जिल्हा बॅंकेची आठवड्यात अवघी 4 टक्केच वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDCC Bank latest marathi news

NDCC Bank Recovery : ते पत्र पडतंय भारी! जिल्हा बॅंकेची आठवड्यात अवघी 4 टक्केच वसुली

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची थकबाकी वसुली सुरू असताना पालकमंत्र्यांनी दिलेल्या एका पत्रामुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. आठवडाभरात अवघी चारच टक्के वसुली झाल्याने ती वाढणार कशी, याची चिंता बॅंकेला लागून आहे. (NDCC Recovery only recovered 4 percent in week nashik news)

जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या बिऱ्हाड आंदोलनानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार जिल्हा बॅंकेने विविध कार्यकारी सोसायटींकडून थकबाकीदार सभासदनिहाय सहा टक्के, सात टक्के व आठ टक्के दराने होणारे सरळव्याजाची आकारणी करून तशी माहिती मागविली आहे.

सोसायटींकडून ही माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. दुसरीकडे याचा परिणाम म्हणून थकबाकी वसुलीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. त्या पत्रानंतर केवळ ४.४१ टक्के वसुली झाली आहे. गत वर्षी हीच वसुली जानेवारी महिन्यात १२.२४ टक्के होती.

जिल्हा बॅंकेतर्फे सुरू असलेल्या लिलाव प्रक्रियाविरोधात पालकमंत्री भुसे यांच्या घरासमोर जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीतर्फे गत महिन्यात बिऱ्हाड आंदोलन केले. त्या वेळी चर्चेत थकबाकीदार सभासदांना संस्था / बँक आकारणी करीत असलेला व्याजदर मान्य नसल्याने चर्चेदरम्यान थकबाकीदार सभासदांचे थकीत बाकीवर सहा टक्के, सात टक्के व आठ टक्केदरम्यान व्याज सवलत मिळण्याची मागणी केली.

या अनुषंगाने पालकमंत्री भुसे यांनी सरळव्याजाची आकारणी करून तशी माहिती मागवावी, असे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा बॅंकेने जिल्हाभरातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी संस्थांना पत्र देत त्याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मात्र, आदेश देऊन दोन आठवड्याचा कालावधी उलटला असला तरी, सोसायट्यांकडून माहिती दिली जात नसल्याचे बघावसाय मिळत आहे. एका बाजूला सोसायट्यांकडून माहिती मिळत नाही, तर दुसरीकडे मात्र बॅंकेची वसुली बंद पडली असून, आर्थिक फटका बसत आहे.

हे पत्र मिळाल्यानंतर १६ जानेवारीपासून बॅंकेची थकबाकी वसुली जवळपास ठप्प आहे. १६ ते ३० जानेवारी यादरम्यान केवळ चार कोटी चार लाख रुपयांची (४.४१ टक्के) वसुली झाली आहे.

गत वर्षी जानेवारी २०२२ महिन्यात १२.२४ टक्के वसुली झाली होती. कडक वसुली मोहिमेंतर्गत साधारण दिवसाला ७० ते ८० लाख रुपयांची बॅंकेची वसुली सुरू होती. परंतु या पत्रानंतर वसुलीचे प्रमाण निम्यावर आल्याचे बघावयास मिळत आहे.

आठवडाभरातील वसुली (रक्कम लाखात)

१६ जानेवारी (५१.३३), १७ जानेवारी (६०.९१), १८ जानेवारी (३३.७८), १९ जानेवारी (३६.६१), २० जानेवारी (५२.०३), २१ जानेवारी (१०.७७), २४ जानेवारी (३७.५१), २५ जानेवारी (४५.०५), २७ जानेवारी (२८.५६). २८ व २९ जानेवारी (शासकीय सुटी).

टॅग्स :NashikrecoveryNDCC