No Parking Problem : नो-पार्किंगमधील वाहनांवर होईना कारवाई! वाहतूक शाखेचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four wheeler vehicles are parked daily in the no parking zone of Smart Road in front of District Court and Collector's Office.

No Parking Problem : नो-पार्किंगमधील वाहनांवर होईना कारवाई! वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयाने गेल्या आठवडाभरापासून वाहनांची टोइंग बंद केली आहे. त्यामुळे टोइंगमुळे होणाऱ्या त्रासापासून वाहनचालकांना दिलासा मिळाला असला तरी, नो- पार्किंगमधील वाहनांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

असे असतानाही, स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक नो-पार्किंग असतानाही चारचाकी वाहनांची सर्रासपणे पार्किंग असते. याकडे हाकेच्या अंतरावरील सीबीएस चौकातील वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. (Neglect of Transport Department to No parking vehicles nashik news)

शहरातील त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा रस्ता स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट रोड करण्यात आलेला आहे. स्मार्ट रोडच्या दुतर्फा सायकल ट्रॅक करण्यात आलेला आहे. मात्र, स्मार्ट रोड वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून या सायकल ट्रॅक आणि स्मार्ट फुटपाथचा वापर वाहनांच्या पार्किंगसाठी होत आहे.

याबाबत स्मार्टसिटी प्रशासन, महापालिका आणि नाशिक शहर वाहतूक पोलिस शाखेकडून कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी नो-पार्किंग असतानाही बिनधास्त चारचाकी वाहनांची अनधिकृतरीत्या पार्किंग केली जाते. अपवाद फक्त, शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असेल तर, स्मार्ट रोडवर पोलिसांकडून एकाही वाहनाला पार्किंग करू दिली जात नाही.

आदेशाला हरताळ

पोलिस आयुक्तांनी गेल्या आठवड्यात शहरातील वाहतूक शाखेमार्फत चालणारा वाहनांच्या टोइंग ठेक्याला मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यांपासून शहरातील चारचाकी व दुचाकी वाहनांची टोइंग बंद झाली आहे.

यामुळे वाहनचालक नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला असला तरी, आयुक्तांच्या आदेशान्वये वाहतूक शाखेने नो- पार्किंगमधील वाहनांवर ई-चलनाद्वारे दंडाची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु, याकडे वाहतूक शाखेने सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

वाहनचालकांची मुजोरी वाढली

सीबीएस सिग्नल आणि अशोकस्तंभ चौकात वाहतूक शाखेचे पोलिस नियमित कर्तव्यावर असतात. मात्र, या रस्त्यावरील जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ या दरम्यान स्मार्ट रोडच्या दुतर्फा असलेल्या सायकल ट्रॅकवर चारचाकी वाहनांची पार्किंग केली जाते.

सीबीएस सिग्नलवर एकापेक्षा अधिक वाहतूक पोलिस असतात. परंतु ते सिग्नल सोडून या रोडवर केल्या जाणाऱ्या नो-पार्किंगमधील वाहनांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात नाही. कारवाईच होत नसल्याने वाहनचालकांची मुजोरी वाढली आहे. मात्र यामुळे स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्याकडे सदरील वाहतूक पोलिस दुर्लक्ष करतात.

टॅग्स :NashikParking