वैतरणाचा आराखडा १ की १६.५० टीएमसीचा करायचा? जलसंपदा विभागाला प्रश्‍न

vaitarana dam.jpg
vaitarana dam.jpg

नाशिक : ऊर्ध्व वैतरणा धरणातून मुकणे धरणात आणि त्यातून गोदावरी खोऱ्यात वळवणे प्रस्तावित आहे. त्यामुळे वैतरणा वळण योजनेचा आराखडा एक टीएमसीचा की भविष्यात उपलब्ध होणाऱ्या १६.५० टीएमसी पाण्यासाठी करायचा, असा प्रश्‍न जलसंपदा विभागाला पडला आहे. त्याच अनुषंगाने जलसंपदा विभागाने यासंबंधाने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला आहे. 

जलसंपदा विभागाला पडला प्रश्‍न; राज्य सरकारकडे मागविले मार्गदर्शन 

एकात्मिक जलआराखड्यातील तरतुदीनुसार भविष्यकालीन योजनांमध्ये वैतरणा खोऱ्यातून मुकणे धरणात ५.५० टीएमसी पाणी वळवणे प्रस्तावित आहे. तसेच सरकारच्या १९ सप्टेंबर २०१९ च्या दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि गिरणा उपखोऱ्यासाठी कोकणातून पाणी वळवण्यासाठीच्या योजनांना तत्त्वतः मान्यतेचा निर्णय आहे. त्यांपैकी आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प पूर्ण झाल्यावर १० टीएमसी पाणी ऊर्ध्व वैतरणा धरणातून उपलब्ध होणार आहे. असे एकूण १६.५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे प्रस्तावित आहे. दरम्यान, वैतरणा नदी पश्‍चिम वाहिनी असून, त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगरात उगम होऊन १७१ किलोमीटर पश्‍चिम दिशेने वाहून अरबी समुद्रास मिळते. या नदीवर घारगाव (ता. इगतपुरी) येथे ऊर्ध्व वैतरणा धरण बांधलेले आहे. धरणाचे काम १९७३ मध्ये झाले असून, त्यावर विद्युतनिर्मिती करण्यात येते. मुंबई शहराला पाणीपुरवठा होतो. मुकणे धरण मुकणे (ता. इगतपुरी) येथील औंधा नाल्यावर बांधलेले आहे. हा नाला दारणा नदीस मिळतो. हे धरण वैतरणाच्या शेजारी आहे. 

मुकणेपेक्षा अधिक पातळी 
ऊर्ध्व वैतरणा धरणातील पूर्ण संचय पातळी ही मुकणे धरणातील पूर्ण संचय पातळीपेक्षा अधिक आहे. या दोन्ही धरणांचा जलाशय विभागणारा वैतरणा कटक बंधारा हा वैतरणा धरणाच्या उजव्या तीरावर बांधलेला आहे. कटक बंधाऱ्याशेजारी सांडवा बांधून वैतरणाचे पाणी मुकणेमध्ये वळण्याचे प्रस्तावित आहे. सद्यःस्थितीत वैतरणा धरण पूर्ण पातळीपर्यंत भरल्यानंतर सांडव्यावरून वाहून जाणारे पुराचे पाणी वैतरणा नदीत पडून ते अरबी समुद्राला जाऊन मिळते. या वाहून जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा उपयोग नाशिक व नगर जिल्ह्यातील औद्योगिक, सिंचन आणि पिण्यासाठी करता येणे शक्य होणार आहे. वैतरणा धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा अभ्यास केल्यावर दर वर्षी एक हजार १८३ दशलक्ष घनफूट पाणी अरबी समुद्राला जात असल्याचे जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आले आहे. 

वळण बंधाऱ्याच्या कामातील अडचणी 
वैतरणा जलविद्युत प्रकल्पासाठी १९६२ ते १९६७ मध्ये चार हजार ६८९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. सरकारच्या निर्णयानुसार धरणाची उंची कमी केल्याने आणि माती खाणीसाठी संपादित केलेल्या क्षेत्रापैकी ६२३.२२ हेक्टर क्षेत्र अतिरिक्त ठरले. त्याची पुन्हा आवश्‍यकता नसल्याने मूळ मालकास परत करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. त्यांपैकी २७४.६१ हेक्टर क्षेत्र जिल्हा प्रशासनातर्फे परतीसाठी जाहीर केले होते. सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांकडून पैसे भरण्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परतीचे प्रकरण रेंगाळल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जलसंपदा विभागाला कळवण्यात आली. उर्वरित ३४८.६० हेक्टर क्षेत्राबाबत १९८८ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाशी विभागाचा पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र सरकारकडून कोणताही निर्णय प्राप्त झालेला नाही. प्रस्तावित सांडव्याच्या तयारीला सुरवात झाल्यावर सर्वेक्षणाच्या कामासाठी जमिनी परत करण्याच्या मागणीबाबत हरकती घेतल्या गेल्या आहेत. 


जलसंपदामंत्र्यांच्या बैठकी 
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी २५ जुलै २०२० ला वैतरणा कटक बंधाऱ्यास भेट देऊन पाहणी केली. वैतरणा धरणासाठी अतिरिक्त संपादित केलेल्या जमिनी मूळ मालकांना सरकारने परत करण्याच्या विषयावर वैतरणानगर येथे श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीसाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या चर्चेत अतिरिक्त संपादित जमीन परत करण्याबाबत लवकर बैठक घेऊन निर्णय करण्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. २९ जुलै २०२० ला श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्या वेळी जमिनी परत करण्याबाबत विविध पर्यायांवर चर्चा झाली. पुढील बैठकीमध्ये जमीन परत करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com