NMC Biometric Attendance : महापालिकेत कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक! | NMC Biometric attendance mandatory for employees in municipal corporation nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

biometric attendance

NMC Biometric Attendance : महापालिकेत कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक!

NMC Biometric Attendance : महापालिकेत अत्यावश्यक सेवेत गणल्या जाणाऱ्या अग्निशमन असो स्वच्छता किंवा पाणीपुरवठा विभाग, या विभागात काम करणाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना कितीही अडचणी आल्या तरी बायोमेट्रिक हजेरी लावल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही.

यासंदर्भात पालिका प्रशासनाने नव्याने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली असून सकाळ दुपार व सायंकाळी या तिन्ही कालावधीतील बायोमेट्रिक पंचिंग तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एकही नोंद नसेल त्या दिवसाची गैरहजेरी लावण्याच्या सूचना देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. (NMC Biometric attendance mandatory for employees in municipal corporation nashik news)

महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये २०१६ पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. फील्डवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी नव्हती. हालचाल नोंदवही मध्ये नोंद करून वरिष्ठांना अहवाल देणे बंधनकारक होते.

त्यामुळे काम सुरळीत होते. कोविड काळात बायोमेट्रिक हजेरी शासनाच्या सूचनेनुसार बंद करण्यात आली. कोविड नंतर परिस्थिती पूर्व पदावर आल्यानंतर पुन्हा बायोमेट्रिक हजेरी सुरु करण्यात आली. प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे प्राप्त तक्रारीनुसार प्रशासकीय शिस्तीचा भाग म्हणून त्यांनी हजेरी तपासण्याच्या सूचना दिल्या.

पालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे देखील गरजेचे होते. परंतु आता बायोमेट्रिक हजेरी संदर्भात नव्याने आदेश काढण्यात आले आहे. त्यात यापूर्वीचे हजेरी संदर्भातील सर्व आदेश रद्द करून नव्याने बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली.

सकाळी १०, दुपारी तीन व सायंकाळी सहा या तिन्ही वेळेत बायोमेट्रिक पंचिंग तपासण्याचे नियम घालून दिले आहे. नोंद नसेल तर त्या दिवसाची गैरहजरी राहील असे गृहीत धरले जाईल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फिल्डवर अडचण

नगररचना तसेच बांधकाम व मलनिस्सारण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना फिल्डवर जाणे आवश्यक असते. मात्र त्यांनाही आता कार्यालयात येऊन हजेरी लावून त्यानंतर फिल्डवर जावे लागणार आहे.

फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हजेरी न लावल्यास हजेरी लावून घेण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागणार असल्याने यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :NashiknmcAttendance