SAKAL Special : कुसुमाग्रजांच्या जिल्ह्यात NMCच्या पाट्या अशुद्ध; मजकुराचा अर्थबोधच नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC direction board in the area is impure.

SAKAL Special : कुसुमाग्रजांच्या जिल्ह्यात NMCच्या पाट्या अशुद्ध; मजकुराचा अर्थबोधच नाही!

नाशिक रोड : कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा (२७ फेब्रुवारी) जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र जागतिक मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला कुसुमाग्रजांच्या जिल्ह्यात महापालिकेच्या मराठी पाट्या अशुद्ध असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मराठी भाषेतून प्रशासकीय काम करणाऱ्या महापालिकेला अजूनही रस्त्यावरील दिशादर्शक कमानी शुद्ध करण्याचा विसर पडला की काय अशी चर्चा सध्या घडत आहे. (NMC boards impure in Kusumagraja district text has no meaning Nashik News)

कुसुमाग्रजांच्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली. मराठीची उंची कुसुमाग्रजांच्या साहित्याने वाढवली, त्याच कुसुमाग्रजांच्या नाशिक शहरात नाशिक महापालिकेच्या दिशादर्शक कमानींसह दिशादर्शक फलक अजूनही अशुद्धच आहे.

मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला जगभर मराठी भाषेचा गौरव होत असताना कुसुमाग्रजांच्या नाशिक नगरीत मनपाच्या मराठी पाट्या दिशादर्शक कमानी अशुद्ध पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी काना, मात्रा उकार, वेलांटीचा नाशिक महापालिकेला विसर पडला आहे.

शिवाय परिसराची नावे लिहिताना नाशिक महापालिकेने अर्धवट लिहिली आहेत नागरिकांना अक्षरे, शब्द वाचायलाही जड जात असून, अर्धवट नावे व अशुद्ध लिहिल्याने मजकुराचा अर्थबोध होत नाही.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

महापालिका अधिकाऱ्यांचे उजळणीवर्ग घेण्याची वेळ आली की काय, अशी चर्चा भाषाप्रेमींमध्ये घडत आहे. नाशिक रोड, सिडको, सातपूर, पंचवटी विभागात अनेक ठिकाणी अशुद्ध पाट्या असून येत्या जागतिक मराठी दिनाच्या दिवशी या पाट्या शुद्ध करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

"मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी तिची आराधना करणे म्हणजे मराठीत बोलणे, मराठीत लिहिणे, मराठी वाचणे, याव्यतिरिक्त मराठीत शिकणे आहे. म्हणूनच महापालिकेने पाट्या शुद्धीकरण करण्याबरोबरच मराठीचे पावित्र्य जपण्यासाठी अक्षरे शब्द शुद्ध लिहिणे काळाची गरज आहे." - अरुण घोडेराव. कवी, साहित्यिक

"दिशादर्शक पाट्या शुद्ध असणे हा भाषेचा आणि मराठीचा सन्मान आहे. नाशिक महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून दिशादर्शक पाट्या अशुद्ध असल्यामुळे अनेक वेळा लोक अशुद्ध शब्द प्रयोग करतात पर्यायाने बोली भाषेत हा शब्दप्रयोग प्रचलित होतो. म्हणून पाट्या शुद्ध करण्याचे पवित्र काम महापालिकेने हाती घ्यायला हवे."

- योगेश गवळी, नागरिक