
NMC News : आयुक्त रजेवर, अधिकारी मजेवर! 8 गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा
NMC News : महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार हे मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर विभागीय कार्यालयांमध्ये सुटीचे वातावरण असल्याचे शुक्रवारी (ता. १२) अधिकाऱ्यांच्या पाहणीत दिसून आले.
त्यामुळे तातडीने आठ गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (NMC Commissioner on leave 8 Notices to absentee employees nashik news)
आयुक्त डॉ. पुलकुंडवार मसुरीला प्रशिक्षणासाठी गेले आहेत. या कालावधीतील त्यांचा पदभार विभागीय आयुक्तांकडे सोपविला आहे. विभागीय आयुक्त गमे हे नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालयात असल्याने महापालिका मुख्यालयात कोणाचेच नियंत्रण कर्मचारी हजेरी लावून दांडी मारत आहे.
तर अधिकारीदेखील साइट व्हिजिटच्या नावाखाली गायब असल्याचे दिसतात. ऑनलाइन तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याने महापालिकेत सर्व आलबेल असे वातावरण आहे.
नागरिकांच्या कामाकडे अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नसल्याने महापालिकेच्या कामकाजाचा गाडा रुतून पडला आहे. दरम्यान विभागीय आयुक्त गमे यांनी सदरची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांना विभागांना अचानक भेटी देण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार विभागांना भेटी देवून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली. महिला बालकल्याण, विद्युत, वैद्यकीय, निवडणूक शाखा, नगररचना, मिळकत भूसंपादन या विभागात भेट दिली. येथे एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह आठ कर्मचारी गैरहजर आढळून आले. या सर्वांना नोटिसा देवून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
"कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आल्याने अचानक पाहणी केले. त्यात आठ कर्मचारी गैरहजर आढळल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे."
- मनोज घोडे-पाटील, उपायुक्त, महापालिका.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आता ई-मूव्हमेंट रजिस्टर
महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हजेरीची बायोमेट्रिक पद्धत आहे. परंतु बहुतांश वेळा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामांची पाहणी करण्याकरिता शहराच्या विविध भागात जातात.
कार्यालयातून अशाप्रकारे बाहेर जाताना त्यांची पूर्वसूचना विभागप्रमुख अथवा कार्यालयातील वरिष्ठांना देणेबाबत वेळोवेळी सूचित करण्यात येऊनही वरिष्ठांना पूर्वसूचना दिली जात नसल्याने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून कर्मचाऱ्यांच्या हालचालीसाठी ई-मूव्हमेंट ही पद्धत अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला अंतर्गत महापालिकेतील अधिकाऱ्यांना जेव्हा स्वतःच्या कार्यालयाबाहेर कोणत्याही कर्तव्याअंतर्गत जायचे असेल तर त्यांनी त्याबाबतची नोंद सदर कार्यप्रणालीमध्ये करणे आवश्यक आहे. सोमवार (ता.१५ ) पासून या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रशासनाला दिल्या.