
NMC News : MNGLवर बांधकाम विभाग मेहरबान; अद्यापही 40 किमी रस्त्यांची दुरुस्ती बाकी
NMC News : शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. पावसाळ्यात खोदलेल्या रस्त्यांमध्ये पाणी साचून दुर्घटना घडू नये त्यासाठी देण्यात आलेली मुदत संपुष्टात आल्यानंतरही अद्यापही ४० किलोमीटर खोदाई केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती शिल्लक आहे.
रस्ते खोदाई करणाऱ्या एमएनजीएल कंपनीवर महापालिकेचा बांधकाम विभाग मेहरबान का, असा सवाल उपस्थित होत आहे. (NMC Construction Department easy on MNGL 40 km of roads still to be repaired nashik news)
दोन ते अडीच वर्षांपासून नाशिक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहे. परंतु एकीकडे नव्याने रस्ता तयार होत असताना दुसरीकडे मात्र तोच रस्ता खोदाई करण्याचे कामदेखील सुरू आहे.
महाराष्ट्र नॅशनल गॅस कंपनी, स्मार्टसिटी कंपनी व विविध नेटवर्क कंपन्यांच्या माध्यमातून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शोधावी सुरू आहे. रस्ता खोदल्यानंतर त्याची तत्काळ दुरुस्ती करणेदेखील गरजेचे आहे.
त्याचबरोबर रस्ता खोदताना नियम आहे, त्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने नाशिककरांना नको त्या सुविधा असे म्हणण्याची वेळ आली आहे. यापूर्वी महासभा व स्थायी समितीच्या सभेमध्येदेखील खड्ड्यांवरून वादळी चर्चा झाली.
मात्र, आता लोकप्रतिनिधी नसल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांचा हवा तसा फॉलोअप घेतला जात नाही. महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रस्ते खोदाई संदर्भात डेडलाईन आखून दिली. त्यात ११ मेनंतर शहरात खासगी कामासाठी रस्ते शोधण्यास परवानगी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या होत्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रस्त्याचे खोदकाम १० मेपर्यंत पूर्ण करावे व खोदलेल्या रस्त्यांची १५ मेपर्यंत दुरुस्ती करावी, अशा स्पष्ट सूचना होत्या. परंतु खोदलेले रस्ते दुरुस्त करताना अडचणी येत असल्याचे ठेकेदारांनी पटवून दिल्यानंतर ३० मे अंतिम मुदत देण्यात आली होती. सदर मुदत संपल्यानंतर अद्यापही ४० किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही.
७३ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती
शहरामध्ये एकूण २४७ किलोमीटर रस्त्यांच्या खोदकामाला परवानगी देण्यात आली होती. त्यातील ११३ किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले. खोदण्यात आलेल्या रस्त्यांपैकी ७३ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे, उर्वरित ४० किलोमीटर रस्ते अद्यापही नादुरुस्त अवस्थेत आहे.
त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात त्रासाला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती आहे. उर्वरित १३३ किलोमीटरचे रस्ते पावसाळ्यानंतर खोदण्यास परवानगी दिली जाणार आहे.
"रस्ते दुरुस्ती करण्यात तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे विलंब होत आहे. परंतु, खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची कार्यवाही गतीने सुरू आहे." - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता.