NMC Tax Recovery : पहले बातोंसे, बाद में हाथोंसे! पाणीपट्टी वसुलीसाठी विविध कर विभागाची मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest News

NMC Tax Recovery : पहले बातोंसे, बाद में हाथोंसे! पाणीपट्टी वसुलीसाठी विविध कर विभागाची मोहीम

नाशिक : महसुलाचा अपेक्षित टप्पा गाठण्यासाठी लेखा विभागाला उत्पन्नाचे स्रोत शोधण्याच्या सूचना देऊनही त्या शोधल्या जात नाही. त्यामुळे विविध कर विभागालाच उत्पन्नाचे अतिरिक्त वीस कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आता पाणीपट्टी वसुल करण्यासाठी अभियंत्यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून ‘पहले बातोंसे बाद में हाथोंसे’ या धोरणानुसार काम केले जाणार आहे. थकबाकी अदा न केल्यास नळजोडणी तोडली जाणार आहे. (NMC Tax Recovery Campaign of various tax departments for water tax recovery nashik news)

आगामी आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे ३१ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने त्या दृष्टीने पालिका प्रशासनाने ठरवून दिलेले उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विभागांना सतर्क केले आहे. उत्पन्नाचे कायम स्रोत निश्‍चित करतानाच नवीन स्रोतांमधून महापालिकेला उत्पन्न मिळविता येईल का? या संदर्भात पाहणी करण्याच्या सूचना लेखा विभागाला देण्यात आल्या.

परंतु लेखा विभागाने पारंपरिक उत्पन्नाच्या स्रोतांवरच लक्ष केंद्रित करताना घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवर अवलंबून राहण्याचे धोरण अवलंबिले. मार्चअखेरपर्यंत अपेक्षित वसुली गाठावयाची असल्याने विविध कर विभागाने थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला आहे.

दर वर्षी थकीत पाणीपट्टीचा मुद्दा गाजतो. मात्र जुने आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्याकडे लक्ष दिले जात नाही. यंदा मात्र थकबाकी वसुलीसाठी विविध कर विभागाने नवीन पवित्रा घेतला आहे. शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व उप अभियंत्यांच्या माध्यमातून पाणीपट्टीची थकबाकी वसुली होणार आहे.

विशेष वसुली मोहिमेमध्ये विभागीय अधिकारी हे समन्वयकाची भूमिका पार पाडतात. आवश्यकतेनुसार विभागीय अधिकारी स्वतः संबंधित अभियंत्यांसोबत थकबाकीदारांकडे भेटी देतील. विभागीय अधिकारी हे प्रत्येक अभियंत्याला त्यांच्या विभागातील दोन कर्मचारी उपलब्ध करून देतील.

थकबाकीदारांच्या यादीनुसार प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन वसुलीसाठी तगादे लावून वसुली करावी. नळजोडणीधारकाने थकबाकी भरण्यास असमर्थता दर्शविल्यास तत्काळ नळजोडणी खंडित करावी. खंडित केलेली नळजोडणी अवैधरीत्या जोडून घेतल्यास नळजोडणी धारकाविरोधात पाणीपुरवठा विभागामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नळजोडणीधारकांनी थकबाकी भरणा करण्यास मदत मागितल्यास दोन ते तीन दिवस मुदत दिली जाणार आहे. विशेष मोहिमेदरम्यान अनधिकृत नळजोडणी आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

विशेष मोहिमेचा असा आहे स्कॉड

* नाशिक पश्‍चिम : उपअभियंता संजय अडेसरा, कनिष्ठ अभियंता राजेंद्र घेगडमल व दयानंद अहिरे
* नाशिक पूर्व : उपअभियंता एच. पी. नाईक, कनिष्ठ अभियंता एस. एन. गवळी, एस. एम. शिंदे व शाखा अभियंता प्रेमचंद पवार
* पंचवटी : शाखा अभियंता आर. जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता जी. के. गोरडे, श्री. बागूल
* सिडको : उपअभियंता जी. पी. पगारे, कनिष्ठ अभियंता डी. के. शिंगाडे, सहाय्यक कनिष्ठ अभियंता जितेंद्र चव्हाण
* नाशिक रोड : उपअभियंता राजेंद्र ठाकरे, कनिष्ठ अभियंता पी. के. गांगुर्डे, कनिष्ठ अभियंता ए. एल. जेऊघाले व एजाद शेख
* सातपूर : उपअभियंता रवींद्र पाटील व कनिष्ठ अभियंता शोएब मोमीन

सातबारा उताऱ्यावर थकबाकीची नोंद

पाणीपट्टीची थकबाकी वसुली करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्याबरोबरच जागेवर नळजोडणी खंडित केली जाणार आहे. थकबाकी अदा न केल्यास संबंधित नळजोडणीधारकाच्या सातबारा उताऱ्यावर थकबाकीची नोंद केली जाणार आहे. भाडेकरू असल्यास घरमालकाच्या मालमत्ता पत्रकात थकबाकीची नोंद होईल.

"पुढील ३० दिवसांत पाणीपट्टी थकबाकीतून वीस ते पंचवीस कोटी रुपये वसूल करावयाचे आहेत. त्यासाठी नाइलाजाने कठोर पावले उचलणे भाग पडत आहे. थकबाकीदारांनी प्रामाणिकपणे थकबाकी अदा करावी." -अर्चना तांबे, उपायुक्त, विविध कर विभाग