
NMC Water Cut : दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित पाणीकपात! शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद
NMC Water Cut : यंदा पावसाळा लांबणार असल्याने पाणी जपून वापरण्याच्या सल्ला राज्य शासनाकडून देण्यात आल्यानंतर महापालिकेने त्यांचाही कृती आराखडा तयार करताना कपातीचे धोरण अवलंबिले.
परंतु कपात होणार नसल्याचे स्पष्टीकरणदेखील दुसरीकडे देण्यात आले असे असले तरी पावसाळापूर्व कामे व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यातून एकदा पाणीकपात केली जात आहे.
या आठवड्यातदेखील वीजपुरवठा बंद राहणार असल्याने शनिवारी (ता. २०) दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. (NMC Unannounced water cut in name of repair Water supply off for whole day on Saturday nashik news)
दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ‘अल निनो’ वादळामुळे यंदाचा मॉन्सून लांबेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या.
त्याअनुषंगाने पाणीटंचाई कृती आराखडादेखील तयार करण्याच्या सूचना दिल्या. राज्यातील महापालिकांमध्ये नाशिक महापालिकेचा पाणीटंचाई कृती आराखडा प्रभावी ठरला. एप्रिल महिन्यात आठ दिवसातून एकदा व जून महिन्यात हप्त्यातून दोनदा, असे पाणीकपातीचे नियोजन करण्यात आले होते.
परंतु नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारा धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने कपात करू नये, यासाठी राजकीय दबाव वाढला व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील पाणीकपात लांबणीवर टाकण्याच्या सूचना दिल्या.
महापालिका प्रशासनानेदेखील ते आदेश पाळले. मात्र, एकीकडे पाणी कपातीचे आदेश पाळल्याचे दाखविले जात असले तरी दुसरीकडे मात्र छुपा मार्गाने पाणीकपात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शनिवार, रविवार पाणीपुरवठा प्रभावित
वीज महावितरण कंपनीकडून मुकणे धरण येथील रेमंड कंपनीच्या विद्युत उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर गंगापूर धरणाच्या पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे कामदेखील केले जाणार आहे.
त्या व्यतिरिक्त जलवाहिन्यांच्या क्रॉस कनेक्शनची कामे केली जाणार आहे. त्यामुळे २० मेस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे, तर रविवारी (ता. २१) सकाळीदेखील जलकुंभ पूर्ण क्षमेतेने भरणार नसल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
पाणीकपात नसल्याचे स्पष्टीकरण
पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणतर्फे सेट डाऊन घेतले जाते, तर महापालिकेकडूनदेखील क्रॉस कनेक्शन व पंपिंग स्टेशन दुरुस्तीचे कामे करणे आवश्यक ठरते.
त्यामुळे शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहील, मात्र ही नियमित पाणी कपात नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी सांगितले.