Nashik News : NAAC नाही, तर प्रवेश नाही! मुल्‍यांकनाबाबत विद्यापीठाकडून महाविद्यालयांना सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NAAC

Nashik News : NAAC नाही, तर प्रवेश नाही! मुल्‍यांकनाबाबत विद्यापीठाकडून महाविद्यालयांना सूचना

नाशिक : नॅशनल असेसमेंट ॲण्ड आक्रिडीटेशन कौन्‍सिल अर्थात नॅकतर्फे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन प्राप्त न केलेल्‍या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेवर निर्बंध येणार आहेत.

मूल्यांकन नसलेल्‍या महाविद्यालयांमध्ये येत्‍या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी निर्बंध लागू केले जाणार असल्‍याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण विभागांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेले आहे. त्‍यामुळे मार्चअखेरपर्यंत महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. (No NAAC No Admission Instructions from University to Colleges regarding Assessment Nashik News)

यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना पत्र पाठविलेले आहे. तसेच पुणे विद्यापीठातर्फेदेखील संलग्‍नित महाविद्यालयांना पत्र पाठविताना कार्यवाही करण्याच्‍या सूचना केलेल्‍या आहेत.

विद्यापीठाने पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे, की उच्च व तंत्र शिक्षण विभाग, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांनी अकृषी विद्यापीठे व संलग्‍नित महाविद्यालये यांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून घेण्याबाबत वेळोवेळी सूचनापत्र, परिवत्रके निर्गमित केले आहेत.

त्‍यानुसार राज्‍यात बहुसंख्य महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत सहभाग घेऊन नॅक कडून मान्यतेचा दर्जा प्राप्त करून घेतला आहे.

पुणे विद्यापीठ परिक्षेत्रातील संलग्‍नित महाविद्यालये, मान्‍यताप्राप्त परिसंस्‍था, सर्व स्‍वायत्त महाविद्यालये नॅक मुल्‍यांकनास पात्र असून, त्‍यांची मुल्‍यांकनाची वैधता संपुष्टात आलेली आहे. त्‍यांनी पुढील सायकलअंतर्गत पुनर्मूल्यांकन व मानांकन प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

बहुतांश पात्र महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत नॅक मूल्यांकन केलेले नसणे व पुनर्मूल्यांकन वैधता कालावधी समाप्त झाला असल्‍याने नॅकच्‍या संकेतस्‍थळावरुन निदर्शनात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीसाठी महाविद्यालयाच्‍या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणे, शैक्षणिक गुणात्‍मक दर्जा वाढीसाठी नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करणे आवश्‍यक आहे.

महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन प्रारंभ टप्‍यातील संस्‍था नोंदणी करून नॅक कार्यालयास सादर करणे अनिवार्य आहे. निर्धारित मुदतीत आयआयक्‍युए ही प्रक्रिया पूर्ण न केल्‍यास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रथम वर्षाच्‍या प्रवेशास निर्बंध लागू करण्याबाबत शासनास प्रस्‍तावित केले जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

अहवालाची विद्यापीठाकडून घाई

उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे जारी केलेल्‍या सूचनापत्रात महाविद्यालयांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतचा कालावधी दिलेला आहे.

मात्र पुणे विद्यापीठाने संलग्‍नित महाविद्यालयांकडून त्‍यांनी केलेल्‍या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. यामुळे महाविद्यालयांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे.

अठराशे महाविद्यालयांना मूल्यांकन

मुल्‍यांकनाबाबत ‘नॅक’ तर्फे वेळोवेळी आकडेवारी जारी केली जात असते. त्‍यानुसार जून २०२२ मध्ये जारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३५ विद्यापीठे आणि एक हजार ८३४ महाविद्यालयांनी नॅकचे मूल्यांकन प्राप्त केलेले आहे.