Nashik News: पावसामुळे घर कोसळलेल्या वृद्ध दांपत्यास घरकुलाची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gharkul

Nashik News: पावसामुळे घर कोसळलेल्या वृद्ध दांपत्यास घरकुलाची प्रतिक्षा

खामखेडा : सहा महिन्यांपूर्वी सततच्या संततधार पावसामुळे खामखेडा (ता.देवळा) येथील आदिवासी वस्तीत वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी दृष्टिहीन वृद्ध दाम्पत्याचे मातीचे कौलारू घर कोसळले होते. यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला.

या घटनेस सहा महिने उलटूनही प्रशासनाकडून अद्यापही या वृद्ध दांपत्यास घरकुलाचा लाभ दिला गेला नसल्याने त्यांच्या घरकुलाच प्रश्‍न तत्काळ सोडवीत दाम्पत्याला घरकुलाचा लाभ देऊन दिलासा द्यावा अन्यथा कळवण प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा खामखेडा येथील सरपंच वैभव पवार यांनी दिला आहे. याबाबत प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना निवेदनही देण्यात आले.

खामखेडा येथील आदिवासी वस्तीत वास्तव्यास असणाऱ्या ८५ वर्षीय दगा महारु जाधव आणि ८० वर्षीय बायजाबाई दगा जाधव हे वृद्ध दाम्पत्याचे सततच्या संततधार पावसामुळे सहा महिन्यांपूर्वी मातीचे कौलारू घर कोसळले होते. अगोदरच कोणाचाही सहारा नसताना कसे-बसे आयुष्य जगत असतांना त्यात राहते घर जमीनदोस्त झाले त्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी उघड्यावर संसार थाटण्याची वेळ त्यांच्यावर आली.

प्रशासनाकडून तत्काळ घरकुल मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र सहा महिने उलटल्यानंतरही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. सध्या अवकाळी पाऊस, गारपीट सुरू असून यामुळे त्यांचे मोठे हाल होत असून त्यांच्या जीवितास देखील धोका आहे. तरी शबरी आवास घरकुल योजनेअंतर्गत तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे अन्यथा कळवण प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.