
Jal Jeevan Mission : एक क्लिकवर कळणार जलजीवनच्या कामाची सद्यः स्थिती; जाणुन घ्या सविस्तर
Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या योजनेची कामे मार्च २०२४ पर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट्ये निश्चित करून दिली आहे. त्यामुळे कामे वेळात व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने हालचाली सुरू करत जलजीवन मिशन वर्क क्वालिटी मॉनिटरिंग प्रणाली विकसित केली आहे.
या ॲप्लिकेशन बेस प्रणालीचे लोकार्पण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. यात एका क्लिकवर योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यःस्थिती कळणार आहे. (one click you will know current status of aquatic work Inauguration of Jal jeevan Mission Work Quality Monitoring System nashik news)
जलजीवन मिशन अंतर्गत १२२२ कामे सुरू असून घाई-घाईत चुकीचे काम होऊ नये, तसेच कामात कोणी ठेकेदाराने दिरंगाई किंवा वेळकाढूपणा करून दुय्यम दर्जाचे काम होण्याचा धोका असतो.
यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे हे ॲप्लिकेशन तयार केले आहे. या ॲप्लिकेशनसाठी कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता, उपअभियंता यांना तपासणीसाठी लॉगिन देण्यात आले आहेत.
कनिष्ठ अभियंता आणि योजनेसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदार यांना या प्रणालीमध्ये संबंधित पाणीपुरवठा योजनेचे व्हिडिओ, फोटो तारखेनुसार अपलोड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम किती पूर्ण झाले आहे, कामांची सद्यःस्थिती काय आहे, अपूर्ण कामे हे लक्षात येते.
तसेच या कामाच्या कनिष्ठ अभियंता किती वेळा भेट दिली आहे याचे देखिल मूल्यमापन करण्यात येणार आहे. या योजनेसाठी वितरण प्रणाली वेगवेगळी स्वरूपाची आहे. योजनेच्या कामांच्या यादीनुसार त्यांचे वर्गीकरण होणार आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
या ॲप्लिकेशनवर करण्यात आलेल्या डाटाचा वापर जलजीवनच्या नियमित होणाऱ्या आढावा बैठकीत होणार आहे. त्यानुसार अभियंत्यांना प्रशासनाकडून सूचना देता येणे शक्य होणार आहे. सर्व योजनांवर लक्ष केंद्रित करणे या ॲप्लिकेशनमुळे शक्य होणार आहे.
"सदर ॲप्लिकेशनचा वापर करून जिल्हा परिषदेच्या स्तरावरून जलजीवनच्या कामांचे मॉनिटरिंग करण्यात येईल. हे ॲप्लिकेशन वापरण्याबाबत ठेकेदार, कनिष्ठ अभियंता यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत."
- संदीप सोनवणे, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.