esakal | नाशिकला रोज शंभर टन ऑक्सिजन; खासदार गोडसेंच्या पाठपुराव्याला यश
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen

नाशिकला रोज शंभर टन ऑक्सिजन; खासदार गोडसेंच्या पाठपुराव्याला यश

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने कोरोनाबाधितांवरील उपचारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला दररोज १०५ टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली होती. या मागणीची अवघ्या चार दिवसांत संबंधितांनी पूर्तता केली असून, आता यापुढे नाशिकला दररोज शंभर टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी वणवण सुरू होती. यामुळे गेल्या आठवड्यात डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची भेट घेऊन पुरेसा ऑक्सिजनची उपलब्धता करून देण्याबाबत मागणी केली होती. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत सोमवारी (ता. २६) शासनाकडून नाशिकसाठी दररोज शंभर टन ऑक्सिजन साठा आरक्षित करून वितरण करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

२५ टन वाढणार

नाशिक जिल्ह्यात एकूण नऊ ऑक्सिजन साठवणूक केंद्र आहेत. यापैकी दोन केंद्रांकडून प्रत्यक्ष हवेतून ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. मात्र ते प्रमाण अत्यल्प आहे. शासनाकडून दररोज केवळ ८५ टन ऑक्सिजनचा कोटा मंजूर झाला होता. त्यापैकी केवळ ७५ टन ऑक्सिजन साठा नाशिकसाठी उपलब्ध होत होता. मात्र खासदार गोडसे यांच्या प्रयत्नामुळे नाशिकसाठी दररोज शंभर टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

हेही वाचा: पैसे मोजणाऱ्यांनाच मिळतोय बेड?; नाशिक शहरात कोरोना बेडचा कृत्रिम तुटवडा

ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागते आहेत. याशिवाय ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची देखील वणवण सुरू आहे. त्यामुळे शासनदरबारी पाठपुरावा करून नाशिकसाठी दररोज शंभर टन ऑक्सिजनचा साठा मंजूर करून घेतला आहे. यापुढेदेखील ऑक्सिजनच्या साठ्यासंदर्भातील समस्या सोडविण्यात येतील. -हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

हेही वाचा: लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड!

loading image