
नाशिक : संध्याकाळी चालण्यासाठी गेलेल्या गायनाचार्यांना कारने दिली धडक, काही क्षणातच..
बाणगाव बुद्रुक: नांदगाव- येवला रस्त्यावर रविवारी संध्याकाळी भरधाव कारने सायंकाळी चालण्यासाठी गेलेल्या दोघांना धडक दिल्याची घटना घडली. अपघातात प्रसिद्ध गायनाचार्य केशव दत्तात्रय जाधव वय (45) हे जागीच ठार झाले तर सोबत असलेले अतुल चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.
नांदगाव शहरातील विवेकानंद नगर येथील प्रसिद्ध गायनाचार्य केशव महाराज जाधव व प्राथमिक शाळेचे शिक्षक अतुल चव्हाण दररोज सायंकाळी चालण्यासाठी येवला रस्त्यावर जातात. रविवारी सायंकाळी ते नेहमी प्रमाणे चालण्यासाठी गेले होते. नांदगावच्या दिशेने येत असताना भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात केशव महाराज जागीच ठार झाले तर अतुल चव्हाण गंभीर जखमी झाले. अतुल चव्हाण यांना उपचारासाठी माळेगावला हलविण्यात आले.
या अपघातात जीव गमावणारे केशव महाराज जाधव हे प्रसिद्ध गायनाचार्य असून ते मूळचे लक्ष्मीवाडीतील रहिवासी होते. विवेकानंद नगर येथे येवला नांदगाव येवला रोडवर त्यांचे रेडियम व पेंटिंगचे दुकान आहे. त्यांना परिसरात माऊली म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील व बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अपघातात बातमी येताच तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे व सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचा अंत्यविधी सोमवारी (ता.२७) सकाळी १० वाजता विवेकानंद येथे होणार आहे.