Onion Demand : देशांतर्गत राज्यांकडूनही कांद्याची मागणी घटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion Price

Onion Demand : देशांतर्गत राज्यांकडूनही कांद्याची मागणी घटली

नाशिक : कांदा भावात सुरु असलेल्या सततच्या घसरणीमुळे नाशिकसह राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरेतर संकटात सापडलेल्या याच शेतकऱ्याने गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर २०२२ या काळात १ हजार ९९८ कोटी रुपयांचा ९ लाख ५० हजार मेट्रीक टन कांदा निर्यात केला होता.

पण सध्या पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशातील निर्यात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचे ढिगच्या ढीग जमा होत आहेत. त्यातच गुजरात, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात कांद्याला मागणीच नसल्याने महाराष्ट्रात कांद्याचे दर कोसळल्याने केंद्र सरकारने उन्हाळी कांद्याच्या निर्यातीचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. (Onion demand from domestic states decreased nashik news)

राज्यात सध्या लेट खरिपाच्या लागवडी खालील क्षेत्र १ लाख ६३ हजार हेक्टर आहे तर एकट्या नाशिक जिल्ह्यात ५१ हजार हेक्टर जमिनीवर लाल कांद्याची लागवड झाली आहे. त्यातील अजूनही निम्मा म्हणजे साधारणपणे २० ते २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा अजूनही बाजारात येणे बाकी आहे.

खरेतर कांद्याच्या माध्यमातून लासलगावसह जिल्ह्यातील इतर बाजारात समितीत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) च्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२१ या काळात राज्यातून १,०४४ कोटी रुपयांचा ४.६५ लाख टन कांदा निर्यात झाला होता.

एप्रिल ते डिसेंबर २०२२ या काळात १९९८ कोटी रुपयांचा ९.३० लाख टन कांदा निर्यात झाला आहे. तुलनेत गेल्या वर्षी ४.६५ लाख टन जास्त कांदा निर्यात झाला आहे. तरीही राज्यात कांद्याचे दर कोसळले आहेत.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

उन्हाळी कांदा निर्यात नियोजन आवश्‍यक

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांच्या म्हणण्यानुसार, कांद्यावर निर्यात बंदी घातलेली नाही. संबंधित देशांची पत नसल्याकारणाने त्यांच्याकडून कांदा खरेदी होत नाही. कांद्याची निर्यात नियमित सुरू आहे.

मात्र, किसान सभेच्या म्हणण्यानुसार सध्या गुजरात, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात कांद्याला मागणीच नाही. बाजारात येणारा लाल कांदा लवकर खराब होत असल्याने त्याची साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे आवक वाढतेय तर दुसरीकडे मागणी नसल्याने शेतकरीचा उत्पादन खर्च ही भरून निघत नाही.

त्यातच दुसरीकडे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशातील निर्यात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचे ढिगच्या ढीग जमा होत असून कांदा दर कोसळत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने उन्हाळी कांद्याच्या निर्यातीचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.