कांदा उत्पादकांना दोन हजार कोटींचा दणका! निर्यातविषयक धोरणातील धरसोडपणा नडला

sakal (97).jpg
sakal (97).jpg

नाशिक : कांद्याचे उत्पादन आणि निर्यातविषयक धोरणातील धरसोडपणामुळे कृषिपंढरीतील कांदा उत्पादकांना मागील १२९ दिवसांमध्ये जवळपास दोन हजार कोटींचा फटका बसला आहे. ऑक्टोबरमध्ये उन्हाळ अन्‌ लाल कांद्याचा सरासरी भाव क्विंटलला चार हजार ते चार हजार ८०० रुपयांपर्यंत पोचला होता. आज हाच कांदा बाराशे ते तेराशे रुपये क्विंटल या सरासरी भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांद्याचे आगर असलेल्या लासलगावमध्ये नोव्हेंबर ते आजअखेर शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्यासाठी ८२ कोटींहून अधिक, तर लाल कांद्याला २९७ कोटींहून अधिक असे एकूण ३८० कोटींहून अधिक पैसे कमी मिळाले. 

कृषिपंढरीतील कांदा उत्पादकांना दोन हजार कोटींचा दणका 

लासलगावमध्ये विकलेल्या कांद्याच्या तुलनात्मक अभ्यासानुसार २०१६-१७ च्या मार्चमध्ये उन्हाळ कांद्याची ४७ हजार २२१ क्विंटल आवक झाली आणि त्यास ५८४ रुपये सरासरी भाव मिळाला. २०१७-१८ च्या मार्चमध्ये उन्हाळ कांद्याची तीन लाख क्विंटल आवक झाली आणि त्यास सरासरी ७८२ रुपये, तर लाल कांद्याची दोन लाख तीन हजार क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ७९६ रुपये क्विंटल भाव मिळाला होता. २०१८-१९ मध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी ६३१ रुपये भाव मिळाला आणि ३६ हजार ७२९ क्विंटलची आवक झाली व लाल कांद्याची पाच लाख एक हजार क्विंटलची आवक होऊन त्यास ५८९ रुपये असा भाव होता. २०१९-२० मध्ये एक लाख १३ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याला सरासरी एक हजार ५२९ आणि सहा लाख १६ हजार लाल कांद्याला सरासरी एक हजार ५२० रुपये भाव होता.

शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या नुकसानीची कल्पना

आता गेल्या नऊ दिवसांत लासलगावमध्ये ३२ हजार २२१ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन त्याचा क्विंटलचा सरासरी भाव एक हजार ५५१, तर लाल कांद्याची एक लाख ६९ हजार ५२१ क्विंटल आवक होऊन त्यास क्विंटलला सरासरी दोन हजार ८१ रुपये भाव मिळाला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये उन्हाळ कांद्याची एक लाख ८० हजार ९११ क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी चार हजार ३१३ रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. त्याच वेळी लाल कांद्याची ३७८ क्विंटल आवक होऊन त्यास सर्वसाधारण चार हजार ८१९ रुपये क्विंटल असा भाव राहिला होता. कांद्याच्या भावाची आणि आवकेची तुलनात्मक स्थिती पडताळल्यानंतर शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या नुकसानीची कल्पना येते. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

निर्यातीचे पाठबळ नसल्याने घसरण 
जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या दणका का बसला, याची माहिती घेतल्यावर विविध कारणे पुढे आली. त्यात प्रामुख्याने निर्यातीचे न मिळालेले पाठबळ हे कारण पुढे आले आहे. केंद्र सरकारने निर्यात खुली केली असली, तरीही निर्यातविषयक धरसोडीमुळे पाकिस्तानने कांदा निर्यातीत आपली पाळेमुळे खोलवर रुजविण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे निर्यातदारांचे निरीक्षण आहे. या महिन्याच्या सुरवातीला श्रीलंकेसाठी भारतीय कांद्याला टनाला ७०० ते ७५० डॉलरचा भाव मिळाला. त्या वेळी पाकिस्तानने आपला भाव ५५० डॉलर ठेवला होता. एका आठवड्यात भारतीय कांद्याचा निर्यातीचा भाव टनाला ३८० डॉलरवर आला असताना पाकिस्तानने २५० डॉलर भाव केला आहे. म्हणजेच, काय, तर आयातदारांना कंटेनरमागे १५ लाखांचा दणका बसल्याने आयातदारांनी खरेदीकडील हात आखडता घेतला आहे.

पाकिस्तानचा कांदा अंतिम टप्प्यात

त्याच वेळी निर्यातीसाठी लागणाऱ्या कंटेनरला दुप्पट ते अडीचपट भाडे मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत निर्यातदारांना दिसत असलेला आशादायक कवडसा म्हणजे, पाकिस्तानचा कांदा अंतिम टप्प्यात पोचलाय. पुढच्या महिन्यापासून दोन महिने पाकिस्तानचा कांदा जागतिक बाजारपेठेत राहणार नाही. त्याच वेळी पाकिस्तान आणि भारतीय कांद्याच्या भावातील फरक कमी झाला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून भारतीय कांद्याची निर्यात वाढण्यासाठी मदत होऊन एप्रिल ते जूनपर्यंत शेतकऱ्यांना किलोला २० ते २२ रुपयांपर्यंत भाव मिळेल, असे आडाखे निर्यातदारांनी बांधले आहेत. 
सद्यःस्थितीत गुजरातमधील बाजारपेठांमधून दिवसाला ४० हजार क्विंटलवरून एक लाख क्विंटल कांद्याच्या लिलावाचे धोरण व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या दबावामुळे स्वीकारले आहे. चाकण भागातील उन्हाळ कांदा विक्रीसाठी येत आहे. शिवाय १५ एप्रिलपासून शेतकरी आणि व्यापारी उन्हाळ कांद्याची साठवणूक करण्यास सुरवात होईल. तोपर्यंत लाल कांदा विक्रीसाठी येण्याचे प्रमाण कमी होईल. साठवणुकीतील उन्हाळ कांद्याची विक्री नवीन लाल कांदा बाजारात येईपर्यंत सुरू राहील. यंदा साठवणुकीकडे कल वाढण्याची चिन्हे दिसताहेत. उन्हाळ कांदा साठवणुकीसाठी दुप्पट भाडे देऊन चाळी ‘बुक’ केल्या जात असल्याने साठवणूक वाढण्याची शक्यता अधिक आहे. 

दक्षिणेतील पावसावर भाव अवलंबून 
दक्षिणेत जून-जुलैमध्ये होणाऱ्या पावसामुळे त्या भागातील कांद्याचे नुकसान होते. त्यामुळे साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळतो. हा गेल्या दोन वर्षांचा अनुभव जमेस आहे. त्यामुळे दक्षिणेतील पावसावर यंदाच्या साठवणुकीतील उन्हाळ कांद्याच्या भावाचे भवितव्य अवलंबून राहील, असे दिसते. 

कांद्याला मंगळवारी मिळालेला भाव (आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 
लाल : मुंगसे- १ हजार २५१, मनमाड- १ हजार, लासलगाव- १ हजार ३५१, पिंपळगाव- १ हजार ३५१ 
उन्हाळ : लासलगाव- १ हजार २५०, पिंपळगाव- १ हजार ६५१, मुंगसे- १ हजार २००, कळवण- १ हजार ३०१, देवळा- १ हजार ३५० 


निर्यात व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी दोन वर्षापूर्वी दहा टक्के अनुदान सरकारकडून मिळत होते. मात्र शेजारील राष्ट्रांच्या आक्षेपानंतर गेल्या वर्षी हे अनुदान मिळाले नाही. जानेवारीपासून सरकारने वाहतूक आणि साहित्याच्या खर्चाचा परतावा देण्याचे धोरण स्वीकारले. पण खर्चाचा किती टक्के परवाना मिळणार आहे?, त्यात कांद्याचा समावेश आहे की नाही? याच्या मार्गदर्शक सूचना यंत्रणांच्या हातात पडल्या नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे निर्यातीला चालना मिळू शकलेली नाही. - विकास सिंह (कांदा निर्यातदार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com