Onion Price : कांदा घसरून 1400 रुपये क्विंटलवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion Price

Onion Price : कांदा घसरून 1400 रुपये क्विंटलवर

नाशिक : कर्नाटक-आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी उशिरा केलेली लागवड, राजस्थानमधील नवीन कांद्याची आवक आणि मध्य प्रदेशातील कांद्याची उपलब्धता अशा कारणांमुळे कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याच्या सरासरी भावात क्विंटलला एक हजार ते बाराशे रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांकडून आंदोलनाची ठिणगी लासलगाव बाजार समितीत पडली असून त्यांनी लिलाव रोखले होते. सरकारने ३० रुपये किलो भावाने कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.लासलगावच्या बाजार समितीत गेल्या २१ दिवसांमध्ये ४ लाख ६६ हजार १६४ क्विंटल कांद्याची सरासरी २ हजार १६ रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाली.

दक्षिणेतील कांदा नोव्हेंबरच्या मध्याला संपत येतो आणि व्यापारी खरेदीसाठी नाशिकला येतात, असा गेल्यावर्षीपर्यंतचा अनुभव जमेस होता. मात्र पावसाच्या विचित्र खेळामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या नुकसानीमुळे दक्षिणेतील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड उशिरा केली आणि हा कांदा अजूनही बाजारात विक्रीसाठी येत आहे. अशातच, उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने साठवणुकीतील कांदा विक्रीसाठी आणण्यासाठी ‘वेट अँड वॉच''ची भूमिका स्वीकारली होती. मात्र भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून आवक वाढली आणि भावातील घसरण वाढत गेली.

पिंपळगावमध्ये १ नोव्हेंबरला २ हजार ६५० रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला होता. त्यानंतर आज १ हजार ४५१ रुपये क्विंटल अशा सरासरी भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. लासलगावमध्ये १ नोव्हेंबरला २ हजार ४७०, तर आज १ हजार ४०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव शेतकऱ्यांना मिळाला. कांद्याच्या भावातील घसरणीची नाराजी सटाणा बाजार समितीत शेतकऱ्यांमध्ये उमटली. कांदा उत्पादक निर्यातीला प्रोत्साहन देऊन कांद्याच्या भावात सुधारणा करण्यासाठी सरकारने लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी करत होते.

निर्यात भावात घसरण

देशांतर्गत बाजारपेठेत घरगुती वापरासाठी कांद्याची मागणी आहे. मात्र निर्यातीमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशाचा अपवाद वगळता इतर देशांमध्ये कांद्याची फारशी मागणी नाही. श्रीलंकेतील स्थानिक कांदा संपला असल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत टनाला ५०० डॉलर या भावाने कांदा निर्यात झाला. आता ३५० डॉलरला कांदा निर्यात होत आहे. बांगलादेशमधील निर्यातीचा भाव टनाला ४०० डॉलरवरून २८१ डॉलर असा झाल्याची माहिती निर्यातदारांनी दिली.

लासलगाव बाजार समितीत कांद्याची स्थिती

वर्ष (नोव्हेंबर) आवक (क्विंटलमध्ये) भाव

२०१८-१९ - २ लाख ४ हजार ९५४ - ६२८ रुपये

२०१९-२० - ६८ हजार १११ - ५, ७१२

२०२०-२१ - २ लाख ८५ हजार ३८९ - ३,६३६

२०२१-२२ - ३ लाख २ हजार ३४९ - ३,००८